The young man took a bath in the municipal corporation for water, Unique movement of MNS in Dhule
पाण्यासाठी तरूणाने महापालिकेतच केली आंघोळ, धुळ्यात मनसेचे अनोखे आंदोलन
Dhule धुळे : शहरात होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात संताप व्यक्त करत मंगळवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये आयुक्त देविदास टेकाळे यांच्या दालनाबाहेर आंघोळ करीत धुळे शहरात सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे.
धुळे शहरात सध्या दहा ते बारा दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. मात्र या प्रशानाकडे मनपा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. धुळे शहरात गेल्या काही वर्षापासून पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागात दहा ते बारा दिवस पाणी मिळत नाही. महापालिकेच्या निवडणुकी वेळी मंत्री गिरीष महाजन यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिले होते; त्याचे काय झाले? कि तोही १५ लाखांसारखा एक जुमलाच होता? असा सवाल मनसेने यावेळी विचारला आहे. खटकणारी बाब म्हणजे, धुळे मनपा ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारते. मात्र, प्रत्यक्षात ५० दिवसही पाणी पुरवठा होत नाही. मग उर्वरीत ३१५ दिवसांची पाणीपट्टी जनतेने का भरावी, असेही मनसेने विचारले आहे.
धुळे शहरात सध्या पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा आंदोलने करून प्रशासनाचा लक्ष वेधनाच्या प्रयत्न केला, मात्र धुळे महानगरपालिका प्रशासना कडून याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. धुळे शहराची पाण्याची समस्या सोडवली नाही तर पुढील काळात रोजच आयुक्तांच्या दालनासमोर अंघोळ करू असा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.