What really happened in the free show of ‘The Kerala Story’?
‘द केरला स्टोरी’च्या फ्री शो मध्ये नेमकं काय घडलं?
Dhule News धुळे : ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर आधारीत कथानक असलेला ‘द केराला स्टोरी’ या चित्रपटाच्या धुळ्यातील मोफत शो ला रविवारी तरुणींसह महिलांची तुफान गर्दी झाल्याने शेकडो तरुणी व महिलांना चित्रपट पाहता आला नाही. परिणामी खूप वेळ उन्हात ताटकळत थांबलेल्या महिला व तरुंणींना चित्रपट न पाहताच परत जावे लागले. यावर भाजपने महादेव परदेशी यांच्यामार्फत जाहीर दिलगिरी व्यक्त केली.
ज्योती चित्रपटगृहात भाजपा शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते धीरज परदेशी याच्या वतीने महिला व तरुणींसाठी रविवारी ‘द केराला स्टोरी’ या चित्रपटाचा मोफत शो आयोजित केला होता. या शोसाठी ७०० तिकीटे बुकिंग करुन त्यांचे वाटप करण्यात आले होते. या मोफत शोसाठी सोशल मीडियावरुन जोरदार प्रचारही करण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून रविवारच्या मोफत शोला शेकडो महिलांसह तरुणींची मोठी गर्दी उसळली. त्यामुळे आयोजकांचे नियोजन कोलमडले. भर कडक उन्हात महिला, तरुणी ताटकळत थांबल्या.
मात्र आसनक्षमता मर्यादित असल्याने चित्रपटगृहात प्रवेश मिळणे शक्य नाही हे पाहून मोठ्या संख्येने महिला निराश होवून परत गेल्या. परिस्थिती माहित पडताच महापौर प्रतिभा चौधरी, अल्फा अग्रवाल, माजी महापौर जयश्री अहिरराव, मनपा स्थायी सभापती किरण कुलेवार, मायादेवी परदेशी, सारिका अग्रवाल, सुरेखा ओगले, कर्पे, महादेव परदेशी हे चित्रपटगृहात दाखल झाले. त्यांनी चर्चा करुन चित्रपटगृहात आसनांव्यतिरिक्त रिकाम्या जागेवर महिलांना बसू देण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही थांबलेल्या महिला व तरुणींना चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहता आला.
या व्यवस्थेसाठी धीरज परदेशी यांच्यासह प्रदीप पानपाटील, मनोज चौधरी, किरण चौधरी, राहुल परदेशी, सागर कोडगीर, संतोष परदेशी यांनी परिश्रम घेतले.