Factory of fake poisonous liquor destroyed in Dhulai
धुळ्यात बनावट विषारी दारूचा कारखाना उद्ध्वस्त
Dhule News धुळे : शहरालगत असलेल्या मोराणे शिवारात असलेल्या उच्चभ्रू वस्तीतील एका घरामध्ये सुरू असलेला बनावट विषारी दारूचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला असून, तीन संशयितांना अटक केली आहे. तसेच ६४ हजार ८०० रुपये किमतीची बनावट दारू जप्त केली आहे. ८ एप्रिल रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. मोराणे गावाच्या शिवारात संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाच्या समोर एका बंद घरामध्ये काही संशयित इसम बेकायदेशीररित्या लोकांच्या आरोग्यास हानिकारक असलेली बनावट आणि विषारी दारू तयार करीत असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. त्यानुसार धुळे तालुका पोलिसांनी सदर घरावर आठ मे रोजी रात्री उशिरा छापा मारला. त्यावेळी त्या घरामध्ये बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या तसेच इतर साहित्य निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलिसांनी मलिंदरसिंग गुरुमुखसिंग शिकलकर (वय २७, रा. यशवंतनगर, धुळे), रमेश गोविंदा गायकवाड (वय ४५ रा. चितोड भिलाटी ता. धुळे) आणि भिलु भिवराज साळवे (वय ३०, रा. यशवंतनगर, धुळे) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ६४ हजार ८०० रुपये किमतीची बनावट विषारी दारू जप्त केली. तसेच पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाईल, वीस हजार रुपये किमतीची एक दुचाकी आणि ९१४ रुपये किमतीचा इतर मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई विषयी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी अधिक माहिती दिली.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, विजय जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील विंचुरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, कांतीलाल शिरसाठ यांच्या पथकाने केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी धुळे तालुका पोलिसांचे कौतुक केले.