25,000 reward for information about Hadakhed murder
हाडाखेड खुनाची माहिती देणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस
Dhule News धुळे : शिरपूर तालुक्यातील हाडाखेड शिवारात खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या खुनाची माहिती देणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी मंगळवारी दिली. दोंडाईचा खून प्रकरणाचा तपास लागला असून, चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
दोंडाईचा खून प्रकरण
येथील पुष्पा हॉटेलातील मुख्य आचारी व हॉटेलवर काम करणारा कर्मचारी यांच्यात काहीतरी कारणावरून भांडण झाले. भांडणाचे रूपांतर कर्मचाऱ्याने आचारीच्या पोटात, पाठीवर लोखंडी सुऱ्याने सपासप वार करून आचारीचा खून केला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. सकाळी ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिस दाखल झाले होते. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नरेश लालचंद साहू (वय ५४, रा. मध्यप्रदेश) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी संशयित तरुणाला पाळधी येथून ताब्यात घेतले. तसेच त्याने मदतीसाठी बोलावलेल्या तीन मित्रांनाही जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. नंदुरबार रोडवरील पुष्पा हाॅटेल दोंडाईचा-नंदुरबार रस्त्यावर एक किलोमीटर अंतरावर सागर निवाणी यांचे पुष्पा नावाचे शाकाहारी, मांसाहारी हॉटेल आहे. गेल्या वर्षभरापासून हे हॉटेल कार्यरत आहे.
नरेशकडे चार आधारकार्ड
या हॉटेलात नरेश लालचंद साहू हा आचारी म्हणून कामाला हाेता. यापूर्वी पण त्याने इतर हॉटेलात आचारी म्हणून काम केले आहे. तो ज्या ठिकाणी कामाला लागत असे त्याठिकाणाचे आधार कार्ड अपडेट करीत असे. त्याच्याकडे अपडेट केलेले चार आधार कार्ड पोलिसांना आढळून आले.
आचारी असलेला नरेश याला कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याने तो २४ तास हॉटेलात राहत असे. नरेश चांगला आचारी असल्याने हॉटेलात गर्दी राहत असे. पहाटे २ वाजता झाले भांडण रविवारी रात्री साडे बारा वाजेपावेतो हॉटेल सुरू असल्याचे सांगण्यात आले. नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाल्यानंतर रात्री नरेश साहू त्याच्या सोबतचे दोन कर्मचारी असे तिघे झोपण्यास गेले. नरेश साहू आणि एकाचे काहीतरी कारणावरुन पहाटे २ वाजता कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने लोखंडी सुऱ्याने नरेश साहू याच्या पोटात तसेच पाठीवर वार करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला.
हॉटेलच्या पहिल्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात नरेश हा जमिनीवर पडलेला हाेता. तू कोणाला काही बोलला तर तुला मारून टाकू असे बोलून मारेकऱ्याने रक्ताने माखलेला चाकू टेबलावर ठेवून पसार झाला. साहू रक्ताचा थारोळ्यात पडला होता. जमीन रक्ताने भिजून गेली. जास्त रक्त स्राव झाल्याने साहूने तिथेच जीव सोडला. साहूचा अंगावर नाईट ड्रेस असून पट्टासह फुल पँट व फुल शर्ट घातलेला आढळून आला. संशयितांविरोधात गुन्हा दाखल दोंडाईचा पोलिसात नरेश लालचंद साहू ( वय ५४) यास तीक्ष्ण सुऱ्याने मारून हत्या केल्या प्रकरणी संशयित आरोपी गणेश कोळी (वय २३ रा. पाळधी जिल्हा जळगाव) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला पाळधीतून पकडले. पुढील तपास पाेलिस निरीक्षक केवलसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत.
हाडाखेड खून प्रकरण
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे लालमाती परिसर आहे. या भागात सोमवारी सकाळी एका अनोळखी पुरुषाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे वय अंदाजे ४५ ते ५० इतके असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृृतदेहाच्या मानेवर फास आवळल्याचे व्रण असून हातावर जखम आणि मांडीवर चटक्याची जखम आहे. त्यामुळे त्याला कोणीतरी घातपात करुन तेथे फेकले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्साराम आगरकर, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आल्याने श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला.