Even if the BJP is in power in the municipal corporation, I will do development work as a duty!
महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी कर्तव्य म्हणून मी विकासकामे करणारच!
Dhule News धुळे : महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी शहराचा आमदार या नात्याने कर्तव्य म्हणून मी विकासकामे करणारच, असे आमदार फारूख शाह यांनी स्पष्ट केले. माझ्याकडे कोणत्याही पक्षाचा नगरसेवक, कार्यकर्ता आला तरी मी विकासकामांना निधी उपलब्ध करून देतो, असेही ते म्हणाले.
हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी धुळे महानगरपालिका अपयशी ठरली आहे. मालमत्ता कराची रक्कम नियमितपणे अदा करून देखील सुविधा न देणाऱ्या पालिकेच्या विरोधात गावातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. या भागातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुार आमदार फारुख शाह यांनी ग्रामविकास विभागाकडे तगादा लावला. त्यानुसार ग्रामविकास विभागाने २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे. आ. फारुख शहा यांनी आतापर्यंत शहराच्या विकासासाठी नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग विभाग, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्याक विभाग, क्रीडा विभाग, महिला व बालकल्याण विभागामार्फत मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे.
धुळे मतदासंघात निव्वळ शहरी भागाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शहराच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून निधी खेचून आणण्याची किंमया आमदार डॉ. फारुख शाह यांनी केली आहे. त्या अंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या महिंदळे येथील हालोर यांच्या घरापासून ते डी.पी रस्त्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे या ३० लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ. फारुख शाह यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी नगरसेवक नासीर पठाण, नगरसेवक सईद बेग, प्यारेलाल पिंजारी, जमील खाटीक, आसिफ शहा, दिलीप पारेराव, भुरा पाटील, रघुनाथ हालोर, सतीश सैंदाणे, विशाल देसले, शोभा बडगुजर, सुनिता भोपे, मालुबाई सैदाणे, मधुमाला मोरे, सुरेखा कुवर, शोभा पाटील, शुभम माळी, अभिषेक सूर्यवंशी, अजय बागुल आदी उपस्थित होते.