Road work in Peth area stopped, Shiv Sena protests
पेठ भागातील रस्त्याचे काम रखडले, शिवसेनेची निदर्शने
Dhule News धुळे : शहरातील पेठ भागातील गल्ली क्रमांक पाचमध्ये हाती घेतलेले रस्त्याचे काम रखडले असून, रस्त्यावरील खडी आणि धुळ यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम त्वरीत आणि प्रामाणिकपणे करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
गेल्या एक महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वर्क ऑर्डर प्रमाणे रस्ता न करता वरच्यावर खोदून त्यावर माती व खडी टाकून काम केले जात आहे. सद्यस्थितीत सदर काम बंद आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, वृद्ध व बालक त्रस्त आहेत. धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. व्यापाऱ्यांची दुकाने व घरे धुळीने माखली आहेत. याबाबत विचारणा केली असता संबंधित ठेकेदाराचा माणूस उडवाउडवीची उत्तरे देतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याच्याही तक्रारी आहेत. कामात अनेक त्रुटी आहेत.
रस्ता पूर्णपणे खोदून नियमाप्रमाणे तयार केला पाहिजे. परंतु ठेकेदार त्या पद्धतीने काम करत नाही. सदर कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मूक संमतीने भ्रष्टाचार होत असल्याचा दाट संशय आहे.
रस्ता लवकर व नियमानुसार झाला नाही तर आम्ही या कामाविरूध्द न्यायालयात जाऊ, तसेच आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, कैलास मराठे, रविराज जाधव, हितेश जैन, चेतन अग्रवाल, अमोल सावळे, कुंदन गवळी, सुनिल बागुल, भूषण बागुल, योगेंद्र कोटेचा, सुभाष सोनवणे, वसंत जैन, अमोल मोरे, चेतन जैन, प्रितेश छाजेड, ओमप्रकाश जैन, सुधाकर घोडके, नितीन कांबळे, अॅड महेश वाघ , संजय अग्रवाल, सचिन खंडेलवाल, हितेश कासार, सैय्यद सलीम, सुरेश कासार, अनिल विभांडिक, शुभम बागुल, हेमचंद्र भंडारी, निलेश जैन, प्रशांत चौधरी आदींनी दिला आहे.