‘Shravasti Buddha Vihar’ will be realized through the initiative of women in Dhule
धुळ्यात महिलांच्या पुढाकारातून साकारणार ‘श्रावस्ती बुद्ध विहार’
बुद्ध विहारे ही बुध्द वंदना, धम्मदेसना पुरती मर्यादित न राहता ज्ञानाची, धम्म – संस्काराची, धम्म-प्रचाराची, समाज प्रबोधनाची, समाज परिवर्तनाची, जन जागृतीची, आंबेडकर चळवळीची केंद्रे असावीत. त्यातून बौद्ध संस्कृती निर्माण व्हावी, ती रुजावी, वाढावी या उद्देशाने आणि त्यातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी आदर्श अशी बुध्द विहारांची उभारणी ठिकठिकाणी झाली पाहिजे. याच उद्दात हेतूने महामानव, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे शहरात राजकीय, सामाजिक चळवळ जेवढी रूजली, गतिमान झाली आहे, तुलनेत धम्म चळवळ तेवढी रुजलेली, गतिमान झालेली दिसत नाही. त्यामानाने नागपूर, नाशिक, औरंगाबाद शहरात धम्म चळवळ अधिक गतिमान झालेली आहे. ज्या भागात धम्म चळवळ अधिक रुजते, गतिमान होते, तेथील लोकांच्या जीवनमानात अमुलाग्र बदल घडवून आल्याचे या शहरांतील धम्म चळवळीवरुन दिसून येते.
बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहत असताना गावोगावी बुद्ध विहार व्हावीत, त्यात दर रविवारी, पौर्णिमेला धम्मप्रवचन व्हावेत, सभागृह असावे असे सारनाथच्या सभेत सांगितले होते.
धुळे शहरात बौद्धांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्या तुलनेत बुद्ध विहारांची संख्या कमी आहे. मोगलाईत, मनोहर टॉकीज मागील परिसर आणि लुम्बिनीवन परिसरात बुद्ध विहारांची निर्मिती झालेली आहे. म्हणजेच शहरातील बौद्धांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ती कमी आहेत.
साक्री रोड परिसरातील बहुसंख्य कॉलनीत बौद्धांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. लुम्बिनीवन परिसर, राजरत्न, पंचशील कॉलनी, अजिंक्य तारा सोसायटी, सूरज, शिवतारा, सत्य साईबाबा, करुणा विहार, कुशीनगर अशा कितीतरी कॉलनी परिसर आहेत. तेथील बहुसंख्य घरे बौद्धांची आहेत.
त्या त्या परिसरात, कॉलनीत आपापल्या परीने सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येत असतात. अलिकडे त्याचे प्रमाणही वाढत आहे त्यासाठी विहार, सभागृह असणे ही आता काळाची गरज बनली आहे.
“रमाई महिला बहुउद्देशीय संस्थेची” निर्मिती साक्री रोडच्या अनेक कॉलनीतील बौद्ध महिलांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम करण्यासाठी केलेली आहे आणि त्यासाठी हक्काचे मंच असावे, जागा असावी. याच हेतूने संस्थेतील महिलांनी “श्रावस्ती बुद्ध विहार”उभारण्याचा संकल्प करुन दिनांक ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून त्याचे समारंभपूर्वक भुमिपुजनही केले आहे.
लुम्बिनी बुद्ध विहाराप्रमाणेच आपले श्रावस्ती विहार लोकसहभागातून उभारायचे आहे. धार्मिक चळवळीसाठी, धम्माच्या कार्यासाठी समाज भरभरुन दान आणि प्रोत्साहन देत असतो. याच हेतूने आम्ही श्रावस्ती बुद्ध विहार निर्मितीचा संकल्प केला आहे.
श्रावस्ती विहाराच्या उभारणीसाठी समाजातील अनेक मान्यवरांनी आर्थिक धम्मदान देण्याचे आश्वासन दिले आहे. काहींनी रोख स्वरूपातही दान दिले आहे. पण ते पुरेसे नाही. विहाराच्या उभारणीसाठी अजूनही धम्मदानाची आवश्यकता आहे. विहाराची पायाभरणी पुढच्या महिन्यातील 3 तारखेला म्हणजेच पौर्णिमेला करायची आहे. त्यामुळे समजातील प्रबुद्ध नागरिकांना विनंती करते की, आपणही या सामाजिक कार्यासाठी दान द्यावे. तसेच आपल्या परिचयातील धम्मदान करणाऱ्या दात्यांची नावे व माहिती समितीला देऊन सहकार्य करावे.