State-wide protest by contract nurses, demanding induction into government service
कंत्राटी नर्सेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी
Dhule धुळे : अत्यल्प मानधन असुनही रुग्णसेवा करणाऱ्या कंत्राटी नर्सेसना सरकारी सेवेत कायम करावे, या मागणीसाठी कंत्राटी नर्सेसनी बुधवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करीत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. धुळे जिल्ह्यातील नर्सेसनी धुळे शहरात क्युमाईन क्लबजवळ निदर्शने केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १३ मार्च ते १७ मार्च दरम्यान आंदोलन केले होते. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संघटना प्रतिनिधी व उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी यांच्या समेत २० मार्च रोजी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आरोग्य सेविका, अधिपरिचारिका व इतर एन. एच. एम. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी विधानसभेत शासनातर्फे ३१ मार्चपर्यंत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार शासन सेवेत समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका व अधिपरिचारिका यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत अद्याप कोणतेही ठोस निर्णय व सकारात्मक हालचाली होत नसल्याने कंत्राटी आरोग्य सेविका व आधिपरिचारिका हवालदिल झालेल्या आहेत. संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय आदी ठिकाणी १७ मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास नाईलाजास्तव जून २०२३ पासून कामबंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी दिला.
या आंदोलनात आयटकचे धुळे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड वसंत पाटील, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन धुळे जिल्हाध्यक्षा रेश्मा कोकणी, उपाध्यक्षा छाया आहीरे, वासंती पगार, मंगला शेवाळे, रत्ना चौरे, संगीता पाटील, कुसुम काकविपुरे, रुपाली अवधुतकर यांच्यासह कंत्राटी आरोग्य सेविका सहभागी झाल्या होत्या.