21 lakhs was stolen by the cashier in credit bank
पतपेढीमध्ये कॅशियरनेच केली २१ लाखांची चोरी
Dhule Crime धुळे : येथील पतसंस्थेमध्ये कॅशियरने तब्बल २१ लाखांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पतसंस्थांमधील ठेवी सुरक्षित नसल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.
श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये रोखपालानेच २१ लाखांच्या सुवर्णमुद्रा चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी पतसंस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते. दरम्यान, पोलिसांकडून रोखपालाचा शोध सुरू आहे.
धुळे येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेची नोकरानेच फसवणूक केली असून, लॉकरमधील सुवर्णमुद्रा, हिरेजडीत दागिने असा २१ लाखांचा मुद्देमाल त्याने लंपास केला. याप्रकरणी रोखपाल असलेल्या नोकरावर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवपूरातील नेहरू चौकातील दिनेश कॉम्पलेक्समध्ये असलेल्या श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र वसंतराव खानकरी (वय ६८ रा. शारदानगर, देवपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पतसंस्था कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवलेली पतसंस्थेची जंगम मालमत्ता व तारण असलेल्या साडेसहा लाखांच्या १० ग्रॅम वजनाचे १२ व प्रत्येकी पाच ग्रॅमचे दोन सुवर्णमुद्रा आणि १५ लाख २५ हजार ३१० रूपये किंमतीच्या ३५ ग्रॅमच्या दोन हिरेजडीत बांगड्या, २९.२०० ग्रॅमचे चार हिरेजडीत नेकलेस, ६८.३०० ग्रॅमचा हिरेजडीत नेकलेस सेट, ५३.८०० ग्रॅमचा हिरे जडीत हारसेट कानातील झुमक्यांसह असे एकुण २८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हे पंतसंस्थेत रोखपाल म्हणून नोकरीस असलेला शालीग्राम सुभाष योगेश्वर (रा. श्रीकृष्ण मंदिराशेजारी, देवपूर) याने अपहार व फसवणूक करीत चोरून नेले.
याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंदवे करीत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयात गेले. तोपर्यंत पतसंस्थेतील महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना थांबवून ठेवले होते. पतसंस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून पोलिसांनी पंचनाम्याचे काम सुरू केले. काही वेळानंतर विचारपूस केल्यानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांना पतसंस्थेच्या कार्यालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना वृत्तसंकलनास मनाई करण्यात आली तसेच माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात आली.