धुळे एमआयडीसीसाठी २७ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर
Dhule धुळे : एमआयडीसीत पाण्याचा तुटवडा असल्याने अनेक उद्योग येण्यास उत्सुक नव्हते. पाण्याच्या तुटवडा लक्षात घेऊन आ. फारुक शाह यांनी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी मागणी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी आमदार फारुख शाह यांच्या मागणीला विचारात घेऊन २७ कोटी ४१ लक्ष रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
धुळे जिल्ह्यातील उद्योजकांच्या संघटनेने अनेकवेळा याबाबत मागणी केली होती. मात्र प्रशासन दाद देत नव्हते. आ. शाह यांनी सुसज्ज विभागीय कार्यालय, फायर स्टेशन आणि पाणी योजना यासाठी गेल्या तीन वर्षांपासून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा चालविला होता. आ. शाह यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तीनही मागण्या मान्य झाल्या आहेत.
अशी आहे पाणीपुरवठा योजना
धुळे एमआयडीसीसाठी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेल्या पाणीपुरवठा योजनेत धुळे शहरातील जवळील हरणमाळ धरणातून पाणी आणले जाणार असून, त्यासाठी १० किलोमीटरची पाईपलाईन हरणमाळ धरण ते एमआयडीसीपर्यंत टाकली जाणार आहे. धरणाच्या ठिकाणी जॅकवेल, 2000 घनमीटर क्षमतेचा जलकुंभ आणि २.५ MLD क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे.
हरणमाळ धरणातील पाणीसाठा आरक्षित करणेबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला असून याबाबतची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार फारुक शाह यांनी कळविले आहे. यापूर्वी धुळे एमआयडीसीसाठी आ. फारुख शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारतीसाठी वीस कोटीचा निधी तसेच फायर स्टेशन साठी आठ कोटी मंजूर करण्यात आले आहे. फायर स्टेशनबाबत प्रशासाकिय प्रक्रिया पार पाडून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
धुळे एमआयडीसीत सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास मोठे उद्योग येतील आणि बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल ही भूमिका समोर ठेवून आमदार फारुक शाह प्रयत्नरत असल्याने धुळेकर जनतेने समाधान व्यक्त केले आहे.