Those who give farmland for highways do not have roads to their fields
महामार्गासाठी शेतजमिनी देणाऱ्यांनाच शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत
Dhule धुळे : महामार्गासाठी शेतजमिनी देणाऱ्यांनाच शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि गावकरी हैराण झाले आहेत. महामार्गावरून शेतात आणि गावात जाण्यासाठी रस्ते करावेत, अशी मागणी करीत धुळे तालुक्यातील दहा ते पंधरा गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी आनंदखेडे गावाजवळ सुरत-नागपूर महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. धुळे शहरापासून ते नेर गावापर्यंत या महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावांना जाण्यासाठी तसेच शेतात ये-जा करण्यासाठी सर्वीस रोड तयार करावेत. आनंदखेडा, कुंडाणे, उडाणे, गोताने, सांजोरी, मोराणे, कुसुंबा इत्यादी गावाजवळ मोठे सर्कल तयार करावेत, अशी मागणी शेतकरी व गावकऱ्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणकडे केली होती.
मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नागरिकांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या विरोधात रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरत मागे घेण्यात आले. येत्या चार महिन्यांच्या आत सर्व समस्या सोडविल्या नाहीत तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
निवेदनात म्हटले आहे की,फागणे ते नवापूर 140 किलोमीटर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण व विस्तारीकरणाचे काम सात वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील हा सदोष महामार्ग आहे. कारण या महामार्गाचा सर्वे प्रत्यक्ष जागेवर झालेला नाही. महामार्गाच्या आजूबाजूला गावे वसलेली आहेत याची आठवण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला नाही.
रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांना जाण्या-येण्यासाठी सर्कल द्यावे लागते, सर्वीस रस्ते द्यावे लागतात, शेतकऱ्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी सर्विस रस्ते व पर्यायी रस्ते द्यावे लागतात. महामार्गालगत किती गावांना जोडणाऱ्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांचा अभ्यास NHAI ने केलेला नाही. गावांचे नाम फलक, दर्शनी बोर्ड व्यवस्थित व परिपूर्ण लावलेले नाहीत. कुठल्याही प्रकारे सुविधापूर्ण काम नाही. याबाबत NHAI कार्यालयाला अनेकवेळा भेट देऊन निवेदने दिलेली आहेत, बैठका झाल्या आहेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर पाहणी देखील झाली आहे. परंतु सुविधा देण्याबाबत नेहमीच खोटी आश्वासने दिली जातात. चौपदरीकरण व विस्तारीकरण कामांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मात्र या विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम धुळे जिल्ह्यातील नागरिकांना भोगाव लागत आहे. या महामार्गावर NHAI च्या निष्काळजीपणामुळे अनेक अपघात झालेले असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांना अपंगत्वही आले आहे. अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.
अशा अनेक प्रकारच्या समस्या या महामार्गामुळे निर्माण झाल्या आहेत. म्हणून या समस्यांचा कायमचा निपटारा होण्यासाठी आजूबाजूच्या 15 ते 20 गावांमधील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सुरत-नागपूर महामार्ग तब्बल एक ते दीड तास ठप्प केला होता.