Shiv Sena took out a symbolic funeral procession
एक दिवसाआड पाणी देण्याची निव्वळ वल्गना करणाऱ्यांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा
Dhule News धुळे : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा गाजावाजा करीत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निव्वळ वल्गना करणाऱ्या भाजप सत्ताधाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महिला शिवसैनिकांनी धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले.
ऐन उन्हाळ्यात पाण्याची तहान तीव्र असताना शहराच्या वेगवेगळ्या भागात महापालिकेकडून दहा-बारा दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने धुळे करांच्या भावना तीव्र आहेत. नागरिकांच्या या संतापाला शिवसेनेच्या (उबाठा) महिला आघाडीने वाट मोकळी करून दिली. तिरडीवर हंडे, बादल्या ठेवून, आग्याच्या हातात कळशी देत महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात बोंब ठोकत शहरभर सेना महिला आघाडीने लक्षवेधी अंत्ययात्रा काढली. सोमवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणाबाजी करीत मनपा प्रशासन सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविला.
शिवसेनेची भूमिका
धुळेकरांना किमान दोन वर्ष पुरेल इतका जलसाठा असताना देखील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये शहरातील नागरिकांना पाण्यासाठी महापालिका तरसवत असते. दहा-बारा दिवसाआड होणारा पाणीपुरवठादेखील अत्यंत कमी दाबाने होत असतो. पाण्याची समस्या सुटावी या हेतूने जनतेने भाजपला सत्तेत बसविले. परंतु सत्ताधारी भाजपा दररोज जनतेला उल्लू बनवत आहे. आज, उद्या, परवा करत पाच दिवसाआड तर सोडाच, दहा दिवसानंतरही पाणी दिले जात नाही.
अक्कलपाडा योजनेचे वाभाडे
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्यास अजून अनेक महिने लागतील. ही वस्तुस्थिती असताना खासदार डॉ. सुभाष भामरे हे अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेवर पाहणी दौऱ्याचा सपाटा लावतात. धुळेकरांना भुलथापा देत आहेत.
पालिका प्रशासन टक्केवारीत मग्न
धुळे शहरातील देवपूर, मिल परिसर, साक्री रोड, पेठ भाग, आझादनगर या भागात १२ दिवसानंतरही जनतेला पाणीपुरवठा होत नाही. या प्रकाराला महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग, ओव्हरसीयर आणि नव्याने नेमलेले अकार्यक्षम अभियंता कारणीभूत असून, योग्य नियोजन करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, अभियंता हे टक्केवारीत अडकले असून, ते विकासकामांच्या फाईलीवर टिप्पणी, शेरे मारण्यात व्यस्त आहेत. मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर गेल्या चार वर्षात भाजपाला कुठलाच अंकुश ठेवता आला नाही. त्यामुळे मोठ्या विश्वासाने धुळेकरांनी निवडून दिलेल्या भाजपाच्या नगरसेवकांना देखील जनतेच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर काहीच करता आले नाही. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
या मार्गांवरून निघाली प्रतिकात्मक अंत्ययात्रा
या अंत्ययात्रेची सुरुवात शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून झाली. राणा प्रताप चौक, फुलवाला चौक, जे. टी. कराचीवाला खुंट, पोलीस चौकी, जमनालाल बजाज मार्ग या मार्गांनी अंत्ययात्रा महापालिकेच्या नव्या इमारतीजवळ आली. या ठिकाणी महापालिका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेच्या नावाने बोंब ठोकण्यात आली.
प्रतिकात्मक अंत्ययात्रेत यांचा सहभाग
आंदोलनात शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, डॉ. जयश्री महाजन, अरुणा मोरे, देविदास लोणारी, ललित माळी, भरत मोरे, गुलाब माळी, नरेंद्र परदेशी, मच्छिंद्र निकम, संदीप सूर्यवंशी, अण्णा फुलपगारे, विनोद जगताप, नंदलाल फुलपगारे, संजय जवराज, संदीप चौधरी, प्रवीण साळवे, प्रकाश शिंदे, महादू गवळी, कैलास मराठे, आनंद जावडेकर, लखन चांगरे, पिनू सूर्यवंशी, पंकज भारस्कर, मुन्ना पठाण, शरद गोसावी, आबा भडागे, संजय जगताप, हेमंत बागुल, दिनेश पाटील, सागर निकम, अजय चौधरी, शुभम मतकर, अमोल ठाकूर, निलेश वाघमोडे, कपिल लिंगायत, शत्रुघ्न तावडे, नितीन जडे, दीपक मोरे, प्यारेलाल मोरे, शुभम रणधीर, निलेश चौधरी, निलेश कांजरेकर, प्रतिभा सोनवणे, कुंदा मराठे, सीमा मराठे, शकुंतला खैरनार, संतोष शर्मा, संगीता भागवत, सुरेश चौधरी, किशोर पालेकर, मुकेश भोकरे, लक्ष्मी आदित्य बगन आदी शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.