Moha Processing Unit : Famous for liquor, Moha Phul now produces cold drinks, candies, jams and laddus
दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या महु फुलांपासून आता कोल्ड्रिंक्स, कॅंडी, जॅम अन् लाडू
Nandurbar नंदुरबार : दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या महु फुलांपासून आता कोल्ड्रिंक्स, कॅंडी, जॅम अन् लाडू तयार केले जाणार आहेत. धुळे वनवृत्त अंतर्गत राज्यातील पहिला महू प्रक्रिया उद्योग सुरू होत असून, या उद्योगामुळे आदिवासींच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या महू फुलाला पहिल्यांदाच ६० रुपये प्रति किलो हमी भाव मिळाला.
नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा येथे अंकलेश्वर रस्त्यावर असलेल्या वनक्षेत्रामध्ये महु प्रक्रिया उद्योगासाठी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. एका इमारतीमध्ये महू प्रक्रिया उद्योग चालणार आहे तर दुसऱ्या इमारतीमध्ये उत्पादित झालेले खाद्यपदार्थ साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी सांगितले की, येत्या तीन महिन्यात महू प्रक्रिया उद्योग प्रत्यक्षात सुरू होणार असून, यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, महु प्रक्रिया उद्योगात महू फुलांपासून लाडू, शरबत, जॅम यासह इतर खाद्यपदार्थ तयार होणार आहेत. या खाद्यपदार्थांना शेजारच्या गुजरात राज्यात मोठी बाजारपेठ देखील उपलब्ध आहे. त्यामुळे महु प्रक्रिया उद्योग यशस्वी होईल. आदिवासी बांधवांकडून दुप्पट भावाने महू खरेदी केला जाणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत हा उद्योग चालविला जाणार आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावाचा आणि वनांचा विकास साध्य केला जाईल.
अक्कलकुवा वन परिक्षेत्रातील वनपाल कल्पना धात्रक यांनी सांगितले की, अक्कलकुवालगत जामणे नियत क्षेत्रामध्ये हा प्रक्रिया उद्योग सुरू होत आहे. महू ही स्थानिक प्रजाती असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात महू उपलब्ध होतो. वन विभागामार्फत स्थानिक लोकांकडून ६० रुपये प्रति किलो दराने महू खरेदी केला जात आहे. तसेच महु प्रक्रिया उद्योग आणि कोल्ड स्टोरेज या दोन्ही युनिटमध्ये ७० पेक्षा अधिक स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच स्थानिक क्षेत्रातील आदिवासी पाड्यांमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन महू खरेदी केला जाणार असल्याने आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणावर रोजगाराची सोय होणार आहे.
हिवाळ्यात असतो महूचा हंगाम
महू फुलांचा हंगाम हिवाळ्यात जानेवारी ते मार्च दरम्यान असतो. आदिवासी महिला महुच्या फुलांची ३० रुपये किलो दराने विक्री करतात. परंतु आता दुप्पट भाव मिळणार आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महुजी सर्वाधिक झाडे
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये महू फुलाची सर्वाधिक झाडे आढळून येतात. धुळे जिल्ह्यात साक्री आणि शिरपूर तालुक्यात ही झाडे आढळतात. तर नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये महूची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. साक्री तालुक्यात ज्या भागात महूची झाडे जास्त आहेत, तेथील गावाचे मोहगाव असे नाव आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात ज्या भागांमध्ये महूची झाडे सर्वाधिक आहेत त्या भागाला मोहानीपाडा असे नाव पडले आहे.
महू फुलांचे गुणधर्म असे
भाजीसह खाद्यपदार्थ तसेच आजरांवर उपचारा साठी औषध म्हणून उपयोगात आणतात. आजारपणात तोंडाला चव यावी म्हणून उसळ खातात खोकला, पोटदुखी आजारावर महू फुले गुणकारी आहेत, भाकरीच्या पिठात सुकलेली महू फुले टाकुन खाल्यास शांत झोप येते या महू फुलांच्या सेवनाने खोकलाही नष्ट होतो.