जी चूक माझ्याकडून झाली, ती तुम्ही करू नका ! असं का म्हणाले असतील भगवान करनकाळ?
Dhule धुळे : जी चूक मी केली, ती तुम्ही करू नका. आजारपण कुणालाही सांगून येत नाही. दूर्धर आजार जडल्यावर हातात पैसा नसला तर माणूस हतबल होतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने मेडिक्लेम काढून विमा सुरक्षा कवच धारण करावे, असे आग्रहाचे आणि कळकळीचे आवाहन धुळे शहराचे पहिले महापौर भगवान करनकाळ यांनी जनतेला केले.
भगवान करनकाळ यांच्या पत्नी हैदराबाद येथील खासगी रूग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून दाखल आहेत. करनकाळ यांच्या कुटूंबाचा मेडीक्लेम नसल्याने त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. फुफ्फुसाच्या विकारावर हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भगवान करनकाळ देखील पत्नीसोबत दवाखान्यातच आहेत. एका लग्न समारंभानिमित्त भगवान करनकाळ एक तारखेला धुळ्याला आले होते. त्यावेळी त्यांनी धुळे शहरात साक्री रोडवरील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन आपले कटू अनुभव सांगितले.
सोशल मीडियावरही केला अनुभव शेअर
भगवान करनकाळ यांनी फेसबुकवर देखील आपला अनुभव शेअर केला असून, सामान्य जनतेला आवाहन केले आहे.
”धुळे शहरातील समस्त जनतेने आपली मेडिक्लेम पॉलिसी किंवा विमा संरक्षण पॉलिसी काढावी, असे अत्यंत नम्रपणे, पोटतिडकीने कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे आणि परिवारातील सर्व सदस्यांचे जीवन सुरक्षित करा, ही नम्र विनंती आहे. कुटुंबांच्या कुठल्याही सदस्याला रोगाने पछाडले तर वेळ आणि पैसा खूप खर्च होतो. म्हणूनच जी चूक माझ्याकडून झाली आहे, ती चूक आपण नका करु. विमा कंपनीचे कवच धारण करा. मनुष्य सुरक्षित तर परिवार सुरक्षित, परिवार सुरक्षित तर परिसर सुरक्षित आणि परिसर सुरक्षित तर संपूर्ण गाव सुरक्षित. सगळीकडे आनंद, उत्साह, उमेद, सुखशांती…” धन्यवाद..!
– भगवान रामभाऊ करनकाळ, प्रथम महापौर मनपा धुळे, शिवसेना जिल्हा संघटक धुळे
हेराफेरी करणारे बिल्डर्स निशाण्यावर
धुळे शहरातील जवळपास ९० टक्के बिल्डर्स हे कायद्याने काम करीत आहेत. परंतू दहा टक्के मग्रुरीने वागत आहेत. पै-पै जमवून हक्काचे घर घेणार्या धुळेकरांना फसविणारे बिल्डर्स आपल्या निशाण्यावर असून धुळेकरांसाठी लढा उभारू, न्यायालयात जावू, असा इशारा धुळ्याचे प्रथम महापौर भगवान करनकाळ यांनी दिला आहे.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भगवान बापुजींनी त्यांच्या कुटूंबियांवर कोसळलेले अरिष्ट, असाध्य रोगाशी कुटूंबियांकडून होत असलेला मुकाबला यावर भाष्य करतांनाच रूग्णालयाचे बिल भरतांना सर्वसामन्य जनतेचे प्रचंड हात होतात. ते आर्थिक संकटात कोसळतात. त्यामुळे धुळेकर जनतेने मेडीक्लेम पॉलिसी काढावी, अशी कळकळीची विनंती करनकाळ यांनी केली आहे. त्याच बरोबर जनतेने आयुर्वेद आणि निसर्गपुरक जिवनशैलीचा अंगीकार करावा.
स्वयंपाक बनविण्यासाठी अल्युमिनियमची भांडी वापरू नये, ती आरोग्यास हानीकारक असतात. बांधकाम क्षेत्रात जनतेच्या हितासाठी रेरा कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यामुळे घर घेणार्या ग्राहकांना कायद्याचे कवच, सुरक्षा मिळालेली आहे. धुळ्यातील ९० टक्के बिल्डर्स हे कायद्याने काम करीत आहेत. परंतू दहा टक्के बिल्डर्स कायद्याची मोडतोड करून मग्रुरीने वागत आहेत. घर घेणार्या ग्राहकांची फसवणूक करणार्या त्यांच्या पैशावर डल्ला मारणार्यांना आपण सोडणार नाही. अशा बदमाश बिल्डर्सकडून घर खरेदी करून नका. त्यांच्या विरोधात मी लढा उभारणार असून प्रसंगी न्यायालयातही जावू, असा इशारा भगवान बापुजींनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत भगवान पाटील, सुभाष मराठे, रामदास जगताप, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.