आमदार करणार होते अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची पाहणी, पण सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांनाच मॅनेज केले!
Dhule धुळे : शहराचे आमदार फारुक शाह अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची पाहणी करणार होते. दोन तारखेला त्यांचा दौराही निश्चित झाला होता. पण भाजप सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांना मॅनेज केल्याने ऐनवेळी दौरा स्थगित करावा लागला, अशी माहिती आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
शहराचे आमदार डॉ. फारुक शहा हे पत्रकारांसमवेत अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेची पाहणी करणार होते. तसा त्यांचा दौराही निश्चित झाला होता. परंतु तो अचानक स्थगित झाला. पाहणी दौरा का स्तगीत झाला? याची माहिती आमदारांनी शनिवारी पत्रकारांना दिली. त्यांनी सांगितले की, अक्कलपाडा योजनेची पाहणी करण्यासाठी आयुक्तांना कळविले होते. परंतु महापालिकेचे आयुक्त भाजपाच्या सत्ताधाऱ्यांची चमचागिरी करीत असून, त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून पाहणी दौऱ्याला येण्याचे टाळले. इतर कर्मचाऱ्यांनीही वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. असे असले तरी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि धुळे शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा कधी होईल याचा खुलासा करण्यासाठी महापालिका प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारी अक्कलपाडा योजनेची पाहणी केल्यानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले.
रस्ते कामाचा शुभारंभ
धुळे शहरातील ताशा गल्ली आणि सुलतानियानगर परिसरात रस्ते कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी ५० लाखांचा निधी आ. फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला.
या निधीतून प्रभाग क्रमांक ८ येथे ताशा गल्ली आणि सुलतानिया नगरात रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. सुलतानिया चौक येथे संपन्न झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकबाल अन्सारी होते.
यावेळी नगरसेवक मुकतार अन्सारी, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, आरिफ अन्सारी, डॉ. शराफत आली, जमील अहमद, गुलाम अन्सारी, रफिक पठाण, फैसल अन्सारी, इब्राहीम पठाण, हलीम शमसुद्दिन, हासिम अन्सारी, फहीम अन्सारी, आसिफ पोपट शाह, फारुख अन्सारी, जुबेर शाह, सलमान अन्सारी, फरोग हाजी, इलियास अन्सारी, जावेद अन्सारी, आसिफ अन्सारीआदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन निसार अन्सारी, वासिम अक्रम, रिझवान हाजी अन्सारी, रियाज शाह, गोलू शाह यांनी केले तर सूत्रसंचालन निहाल अक्तर यांनी केले.