Dhule Municipal Corporation उपमहापौर वैशाली वराडे तर भारती माळी सभागृह नेता बिनविरोध
Dhule News धुळे : महानगरपालिकेच्या उप महापौरपदी वैशाली भिकन वराडे तर सभागृह नेतापदी भारती माळी यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली.
येथील महापानगरलिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी भाजपतर्फे वैशाली भिकन वराडे यांचे नाव सुचित करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. वैशाली वराडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या.
निवडणूक प्रक्रियेनुसार उपमहापौर निवडीची औपचारिक घोषणा अजुन झालेली नाही. भाजपच्या महापालिकेतील सभागृह नेता पदासाठी भारती माळी यांचे नाव यावेळी जाहीर करण्यात आले. वैशाली भिकन वराडे (रा. वाखारकर नगर, नाटेश्वर कॉलनी, धुळे) या नावाने शनिवारी उपमहापौर पदासाठीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. माजी महापौर प्रदीप कर्फे यांनी वैशाली वराडे यांचे नाव सुचविले असून, माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी या नावासाठी अनुमोदन दिले आहे. वैशाली वराडे यांनी तीन नामांकन पत्र दाखल केले. अन्य दोन नामांकन पत्रासाठी स्थायी समितीचे माजी सभापती शितल नवले व नगरसेवक हर्षकुमार रेलन हे सूचक असून, अनुक्रमे अमोल मासुळे व माजी उपमहापौर नागसेन बोरसे हे अनुमोदक आहेत. वैशाली वराडे यांचे नाव सर्वानुमते जाहीर केल्याची माहिती खासदार डॉ. भामरे यांनी दिली.
यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल म्हणाले की, उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. खा. डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी यांच्या उपस्थितीत वैशाली वराडे यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले. सभागृह नेतापदी भारती माळी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यामुळे महापालिकेमध्ये शतप्रतिशत भाजपाचे महिला राज सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या भाजपतर्फे आपण अभिनंदन करीत आहोत असे अग्रवाल यांनी सांगितले.
यावेळी माजी उपमहापौर नागसेन बोरसे, भिकन वराडे, जयश्री अहिरराव, स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार, राजेश पवार, हिरामण गवळी, अमोल मासुळे, भगवान गवळी, मायादेवी परदेशी, राकेश कुलेवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेचे सचिव मनोज वाघ यांच्याकडे उपमहापौर पदासाठीचे नामांकन पत्र सादर करण्यात आले.
दरम्यान, उपमहापौर आणि सभागृह नेत्याची निवड बिनविरोध झाली असली तरी ओरिसामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या दुर्घटनेमुळे हा दिवस दुःखाचा आहे. जवळपास अडीचशे प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. मृतांना भाजपातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. जल्लोष करणे देखील भाजपने टाळले.