World Environment Day महिला वन कर्मचाऱ्यांनी तब्बल १७ हजार झाडे लाऊन वाचविले आठ हेक्टर जंगल
Nandurbar News नंदुरबार : सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगा आणि वनसंपदेने नटलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवालगत असलेल्या आठ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण होणार होते. परंतु या वनक्षेत्रात काम करणाऱ्या महिला वन कर्मचाऱ्यांनी तब्बल १६ हजार ८०० झाडे लावून अतिक्रमण होण्यापासून रोखले. गेल्या पाच वर्षांपासून रोपे लावल्यानंतर रात्रंदिवस त्यांचे संगोपन केल्याने सातपुड्यातील आठ हेक्टर जंगल वाचले आहे.
अक्कलकुवापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर अंकुशविहीर परिमंडळात अंकलेश्वर महामार्गालगत जामणी गाव आहे. या गावाला लागूनच वनविभागाची आठ हेक्टर जमीन आहे. जामणी गावाच्या स्मशानभूमीला लागून असलेल्या या वन जमिनीवर अतिक्रमण होणार होते. गावकऱ्यांनी या ठिकाणी अतिक्रमण करून आहे ती झाडे तोडली असती आणि शेती केली असती. महामार्गालगतची वन जमीन असल्याने काहींनी तर हॉटेल्सही सुरू केल्या असत्या.
परंतु हा प्रकार घडण्यापूर्वी वनविभागाने जिल्हा योजने अंतर्गत आठ हेक्टर वन जमिनीवर काम हाती घेतले. आर्थिक वर्ष २०१८-१९ ला तब्बल १६ हजार ८०० रोपे लावली. या रोपांना आता झाडांचे स्वरूप आले आहे. वृक्ष लागवडीचे हे पाचवे वर्ष आहे. बांबू, खैर, आवळा यांसारख्या विविध प्रजातीची झाडे लावली आहेत. बांबूची संख्या सर्वाधिक असल्याने या वनाला बांबू रोपवन असे नाव पडले.
वन परिक्षेत्र अधिकारी ललित गवळी यांच्या नेतृत्वाखाली वनपाल कल्पना धात्रक, वनपाल विजया मोरे, वनपाल भारती पाटील आणि वनरक्षक लिलावती पावरा यांच्यासह अक्कलकुवा वन परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचे खरोखरच उल्लेखनीय संवर्धन केले. वनरक्षक लिलावती पावरा यांनी या कामात विशेष परिश्रम घेतल्याचे सांगण्यात आले.
अक्कलकुवा वन परिक्षेत्रातील या महत्वपूर्ण निसर्गकार्यात धुळे वनवृत्ताचे सेवानिवृत्त वनसंरक्षक दिगंबर पगार, मेवासी वन विभागाचे उप वनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. महिला वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कर्तव्यामुळे वनविभागाची आठ हेक्टर जमीन तर वाचलीच, शिवाय हजारो झाडे वाढल्यामुळे पर्यावरणही संपन्न झाले.
आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना महिला वन कर्मचाऱ्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करावा तितका कमीच आहे.
हेही वाचा