Akshay Bhalerao Murder अक्षय भालेराव खून प्रकरणाचे धुळे जिल्ह्यात पडसाद
Dhule News धुळे : नांदेड जिल्ह्यातील बोढार हवेली येथे जातीवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या अक्षय भालेरावच्या खून प्रकरणाचे धुळे जिल्ह्यात पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. फरार आरोपींना तात्काळ अटक करून भालेराव कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी होत आहे.
धुळे शहरात ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या भीमसैनिकाने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गावात पहिल्यांदा साजरा केली. यामुळे येथील काही जातीयवादी लोकांनी त्याचा राग मनात धरून व काही सत्ताधाऱ्यांनी त्याचा द्वेष करून अक्षय भालेरावचा खून केला. तेथील पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड बौद्ध समूहावर दडपशाही करून जातीयवादी प्रवृत्तींना खातपाणी घालत आहे. अशा पोलीस निरीक्षकाला निलंबित करावे. अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना सत्ताधाऱ्यांनी ५० लाखाची आर्थिक मदत करावी, अक्षय भालेरावचा जखमी भाऊ आकाशला सरकारी नोकरी द्यावी, अक्षय भालेराव निर्घृण हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, या प्रकरणात सरकारी वकील नियुक्ती करण्यात यावा, या प्रकरणाचा तपास नांदेड नागरिक सुरक्षा अधिकारी आयपीएस योगेश कुमार यांच्याकडे देण्यात यावा, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, बोढार गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी पोलीस चौकीची स्थापना करण्यात यावी, सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनाकडून मुंबई मंत्रालय येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, जिल्हा सल्लागार अशोक करंजे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश इंदवे, युवा जिल्हा उपाध्यक्ष यश बागुल, जिल्हा महासचिव आनंद सागर, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बळसाणे, युवा शहराध्यक्ष आकाश बाविस्कर, शिंदखेडा तालुका अध्यक्ष समाधान मंगळे, धुळे शहर सचिव राकेश बेडसे, धुळे शहर सचिव जितेंद्र भदाणे, ग्रामीण जिल्हा संघटक विशाल वाघ, युवा जिल्हा सचिव रोहित वाघ आदिंनी दिला आहे.
शिरपूरमध्येही निदर्शने
केवळ भिम जयंती साजरी केली म्हणून बोंढार येथील जातियवादी गुंडांकडून अक्षय भालेराव या तरुणाची निघृण हत्या करण्यात आली. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिरपूर तालुक्यातील आंबेडकरी जनतेने केली आहे. अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियास तातडीने ५० लाखांचीआर्थिक मदत करावी, आरोपींची मालमत्ता जप्त करुन मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना देण्यात यावी, अक्षय भालेराव याचा भाऊ आकाश यास शासकीय नोकरी देण्यात यावी, अक्षय भालेराव निघृण हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, या प्रकरणात विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अक्षय भालेराव याच्या कुटुंबियास तात्काळ कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे, सामाजिक सौहार्द व सलोखा राखवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशा मागण्या आंबेडकरी जनतेने केल्या आहेत.