दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी, राजीव गांधींची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचे भाजपचे धाडस
Dhule News धुळे : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देशाच्या दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्याची तुलना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी करण्याचे धाडस दाखविण्यास भाजपने सुरूवात केली आहे. पक्षाच्या कामासाठी धुळे दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सोमवारी धुळ्यात तसे वक्तव्य केले.
विजयवर्गीय यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल उपस्थित होते. विजयवर्गीय म्हणाले की, राजीव गांधी यांनी म्हटले होते, ”मी एक रुपया पाठविला तर सामान्य जनतेपर्यंत केवळ १५ पैसे पोहोचतात.” परंतु नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला निधी जनतेपर्यंत पोहोचत आहे. तसेच इंदिरा गांधी यांनी सुरू केलेल्या इंदिरा आवास योजनेपेक्षा सर्वाधिक घरे बांधण्याचे काम मोदींनी केले आहे.
देशातील विघटनवादी शक्तींना सरकार व भाजप कधीच थारा देणार नाही. सगळ्यांचा विकास हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केले. देशाची वाटचाल विकासाकडे सुरू आहे. सध्या देशात शस्त्रांचे उत्पादन वाढविण्यात आले असून, ३१ देशांना भारतातून शस्त्रे निर्यात केली जातात.
देशाच्या गंगाजळीत यामुळे मोठी भर पडत आहे. त्यासाठीच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार लोकांनी निवडून दिले आहे. सगळ्यांचे भले व्हावे, हा केंद्र सरकारचा दृष्टिकोन आहे. गेल्या ९ वर्षात सरकारची त्याच मार्गावर वाटचाल सुरू आहे. विशेष बाब म्हणजे सगळा पैसा गरिबांपर्यंत पोहोचतो आहे. गरिबांच्या हिताच्या अनेकानेक योजना राबविल्या जात आहेत.
महिलांना थेट लाभ होईल, अशा योजना सरकार राबवीत आहे. या योजनांमधून बेरोजगार तरुण तसेच महिलांना स्वावलंबी बनविले जात आहे. त्यातून देशाचा विकास साधला जात आहे. शेतीच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडत आहे. सिंचनाची सुविधा सगळीकडे दिली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.