Monsoon Update : Good news! Monsoon in Kerala in 48 hours
गुड न्यूज! ४८ तासांत मान्सून केरळमध्ये
Pune News पुणे : हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून चक्रीवादळ आणि मान्सूनबाबत काही वेळापूर्वीच मोठी अपडेट दिली आहे. अरबी समुद्रात एकीकडे बिपरजॉय हे चक्रीवादळ घोंगावत असताना दुसरीकडे मान्सूनबाबत एक गुड न्यूज आली आहे. पुढील ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दुपारी १२.२५ मिनिटांनी उपग्रहाद्वारे काढलेला ताजा फोटो शेअर केला आहे. होसळीकर यांनी ट्विटमधून ही माहिती दिली.
दरम्यान, केरळ किनारपट्टीवर अनेक भागांमध्ये गेल्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. यामुळे हा एक चांगला संकेत असल्याचं मानलं जात आहे.
मान्सून यंदा उशिराने दाखल होत आहे आणि त्यातच बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्याला आणखी उशीर होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता होसळीकर यांनी मान्सूनबाबत गुड न्यूड दिली आहे. मान्सूनसाठी केरळमध्ये अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनाऱ्यावरील ढगाल वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून सक्रिय होण्याची परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
बिपरजॉय हे चक्रीवादळ आज पहाटे अजून तीव्र झाले आहे. ते मुंबईपासून १००० किलोमीटर तर गोव्यापासून ८९० किलोमीटर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाण्याची आणि अत्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस ते वायव्य दिशेला सरकेल, असं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय हे च्रकीवादळ आता आणखी तीव्र होत असून भयंकर रूप धारण करत आहे.