Bjp क्या हुआ तेरा वादा? सत्ता तुमची, हाल आमचे!
Dhule News धुळे : शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. सत्तेवर येण्यासाठी निवडणूक प्रचाराच्या वेळी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. सत्ता पूर्णवेळ भोगली. पण धुळेकरांना एक दिवसाआड पाणी मिळाले नाही. याउलट धुळे शहराच्या चौफेर मुबलक पाणी उपलब्ध असताना देखील पाच दिवसाआड मिळणारे पाणी बंद झाले. सध्या काही भागात दहा दिवसाआड तर काही भागात पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नियोजनाअभावी धुळेकरांचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत.
नेमका हाच धागा पकडून धुळ्यातील काही युवा कार्यकर्त्यांनी आगळेवेगळे बॅनर लाऊन धुळेकरांचे लक्ष पुन्हा एकदा पाणी प्रश्नाकडे वेधून घेतले आहे. BJP क्या हुआ तेरा वादा? असा प्रश्न या बॅनरखाली उपस्थित केला आहे. प्रश्नाच्या वर त्यांचे फोटो लावले आहेत ज्यांनी सतत एक दिवसाआड पाणी देण्याच्या पोकळ घोषणा केल्या. धुळ्याचा पाणीप्रश्न विसरलात काय? असा प्रश्न पुन्हा विचारला आहे. ‘सत्ता तुमची, हाल जनतेचे’ असे खोचक स्लोगनही त्यावर आहे. एक दिवसाआड पाणी द्या, नाहीतर राजीनामा द्या! अशी मागणीही या युवा कार्यकर्त्यांनी बॅनरद्वारे केली आहे.
धुळेकरांचे मुलभूत प्रश्न इतर कारणांमुळे मागे पाडले जात असताना या प्रश्नांना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणण्याचे काम केले आहे ते, आनंद लोंढे, किरण गायकवाड आणि शंकर खरात या युवा कार्यकर्त्यांनी. विशेष म्हणजे एक दिवसाआड पाणी दिले नाही तर तुमच्या घरांना रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधू, असा इशाराही दिला आहे.
बुधवारी रात्री बॅनर लावले जात असताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव आणला. तसेच पोलिसांनीही आडकाठी केली. आमचे बॅनर लावण्यास विरोध करीत असाल तर इतरही बॅनर काढा, अशी मागणी केली. त्यामुळे धुळे महानगरपालिका चौकातील इतरही बॅनर काढण्यात आले. त्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे शुभेच्छा बॅनरही होते.
दरम्यान, धुळे शहरात तणावाचे वातावरण असल्याने आणि पोलिसांनी विनंती केल्याने सदर बॅनर तात्पुरते काढून घेतले आहेत. वातावरण निवडल्यानंतर बॅनर पुन्हा लावले जातील. बॅनर लावण्याची परवानगी घेतली आहे, अशी माहिती आनंद लोंढे यांनी दिली.
सोशल मीडियावर जाहीर केलेला संदेश असा
BJP पाणी स्टोरी केव्हा? BJP धुळे महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनो एकदिवसा आड पाणी द्या.. नाहीतर राजीनामा द्या! BJP क्या हुवा तेरा वादा….? ४ वर्षापूर्वी धुळेकर जनतेला खोटे आश्वासन देवून तुम्ही धुळे महानगरपालिका सत्ता घेतलीत… एकही वायदा पूर्ण केला नाही… मे अखेरपर्यंत पाणी देवू? बोला सत्ता उन्माद करणाऱ्यांनो केव्हा दाखवणार पाणी स्टोरी? २० जून २०२३ पर्यंत धुळेकर जनतेला एकदिवसाआड पाणी दिले नाही तर धुळे महानगरपालिका आणि तुमच्या घरांना खाली हंड्याचे तोरण बांधून तीव्र आंदोलन करू!