हिंदू जन आक्रोश मोर्चात हजारोंचा जनसमुदाय
Dhule News धुळे : शहरात साक्री रोडवरील मोगलाई भागात श्रीराम मंदिरामध्ये घडलेल्या मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात शनिवारी भाजपासह हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी भव्य जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये धुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याने तणावाचे वातावरण आहे. मोर्चात श्रीराम मूर्तीची शोभायात्राही काढण्यात आली.
श्रीराम मंदिरापर्यंत मोर्चा गेलाच नाही
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोगलाईतील श्रीराम मंदिराजवळ मोर्चाची सांगता होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले होते. परंतु मोगलांच्या आधी शिवतीर्थ चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला.
मुर्तीची प्राणप्रतिष्ठा १४ तारखेला
मोगलाईतील श्रीराम मंदिराजवळ मोर्चाचा समारोप करून लगेच मूर्तीची विधिवत स्थापना केली जाईल, असेही आयोजकांनी जाहीर केले होते. परंतु मुर्तीची स्थापना १४ तारखेला केली जाणार आहे.
भाजपचे दिग्गज मोर्चामध्ये
मोर्चामध्ये माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक शितल नवले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला.
दोन्ही शिवसेनेचा सहभाग
या मोर्चात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी सहभाग घेतला. शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गट यांचे पदाधिकारी गटागटाने सहभागी झाले.
मोर्चा शांततेत पार पडला
मोर्चा शांततेत पार पडावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शुक्रवारी मुस्लिम समाजाची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. तसेच मोर्चा आयोजकांनाही शांततेत मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, हा मोर्चा नसून श्रीराम मूर्तीची शोभायात्रा आहे, असे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मोर्चामध्ये अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे धुळे शहराला छावणीचे स्वरूप आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेला मोर्चा १२ वाजता अवघ्या तासाभरात शांततेत पार पडला.
नेमके काय घडले होते
धुळे शहरात साक्री रोडवर सर्व जाती-धर्माची संमिश्र वस्ती असलेल्या मोगलाई भागामध्ये श्रीराम मंदिर आहे. या मंदिरामध्ये श्रीराम यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे ७ जून रोजी सकाळी निदर्शनाला आले. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी भिलेश खेडकर या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन संशयितांना त्याच दिवशी अटक केली.
हेही वाचा