अभिमानास्पद, आदिवासी दुर्गम भागातील महिलांनी सुरू केले रुरल मार्ट
Nandurbar News अक्कलकुवा : मोठमोठ्या शहरांमध्ये राहणारी लोकं सुपर मार्केट, सुपर शाॅपी, प्रसिद्ध मार्ट अशा ठिकाणी आवडीने शाॅपिंगला जातात. अशा ठिकाणी खरेदीला जाण्याचे स्वप्नही पहाण्याचे नशिब नसलेल्या आदिवासी दुर्गम भागातील महिलांनी चक्क स्वत:चे सुपर मार्केट सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अक्कलकुवा येथे गटविकास अधिकारी पुलकित सिंह, सभापती नानसिंग शिवाजी वळवी, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. तृप्ती पटले, तालुका अभियान व्यवस्थापक मिनाक्षी वळवी यांच्या हस्ते शुक्रवारी रुरल मार्टचे उदघाटन करण्यात आले. गामीण भागातील महिला स्वयंसहायता समुहातील महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू विक्री करण्यासाठी यापूर्वी केवळ अभियानामार्फत आयोजित केलेल्या प्रदर्शनांमध्येच संधी मिळत असे. आता मात्र रुरल मार्टच्या माध्यमातून महिलांना वर्षभरासाठीची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
काय मिळेल या सुपर मार्केटमध्ये
रुरल मार्टमध्ये महिला स्वयंसहायता समुहातील महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, तांदुळ, दाळी, भगर, बांबूच्या विविध वस्तू, मध, कटलरी, कपडे, आमचूर पावडर, मसाल्याचे पदार्थ, मातीच्या भांडी, चिंचेचे ज्युस, रोशायुक्त चहा, दशपर्णी अर्क, जीवामृत आदी महत्त्वाच्या वस्तू मिळणार आहेत.
खरोखरच शुद्धतेची हमी
विशेष म्हणजे या वस्तू आपल्या मार्केटमध्ये मिळत नाहीत. मिळाल्या तरी त्या शुध्द असतीलच याची शाश्वती नाही. पण आदिवासी महिलांच्या सुपर मार्केटमध्ये त्यांनी त्यांच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने स्वतः पिकविलेल्या उत्पादनापासून तयार केलेल्या अस्सल वस्तू येथे मिळणार आहेत.
पहिल्याच दिवशी प्रतिसाद
पहिल्याच दिवशी रुरल मार्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. स्टॉलधारक महिलांमध्ये उत्साह निर्माण होवून खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिल्याचे महिलांनी सांगितले. रुरल मार्टच्या उदघाटन कार्यक्रमाला तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावून महिलांनी आणलेल्या वस्तूंची खरेदी देखील मोठया प्रमाणात केली.
यावेळी वाय. डी. पवार, अरविंद अहिरे, उपअभियंता एम. डी. पवार, निलेश वसावे, किशोर पवार, पिंकी वळवी, अरविंद बागले, राकेश वसावे, तुषार वळवी, निखील शिर्के, योगेश जाधव, राजेश राठोड, बलराम झांजरे आदी उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक मिनाक्षी वळवी यांनी तर सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवसथान कक्षातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अक्कलकुवा येथे बस स्थानकाजवळ बचत गट भवन आहे. या भवनात रुरल मार्ट सुरू झाले आहे. दुर्गम भागातील महिलांनी सुरू केलेल्या या मार्टला नक्की भेट द्या, असे आवाहन उमेद यंत्रणेने केले आहे.
हेही वाचा