Woman sarpanch interfered in gram panchayat affairs by forging her husband’s signature
महिला सरपंच पतीचा बनावट सह्या करीत ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप
Dhule News धुळे : साक्री तालुक्यातील म्हसदी ग्रामपंचायच्या महिला सरपंच शैलजा राजेंद्र देवरे यांचे पती राजेंद्र आत्माराम देवरे हे ग्रामपंचायतीच्या कारभारात सतत हस्तक्षेप करीत गैरकारभार करीत आहेत. एव्हडेच नव्हे तर स्वतःच सरपंच पत्नीच्या खोट्या सह्या करून त्यांनी मनमानी कारभार चालविला आहे असा आरोप विद्यमान उपसरपंच चंद्रकांत पंडित देवरे व ग्रामपंचायत सदस्य अशोक तुळशीराम मोहिते यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांनिशी केला.
याविषयी चौकशी समितीला गैरकारभाराचे पुरावे, व्हिडीओज देऊनही कारवाई होत नसल्याचेही देवरे यांनी यावेळी सांगितले. चंद्रकांत देवरे म्हणाले की, महिला सरपंच म्हणून शैलजा राजेंद्र देवरे ह्या निवडून आल्यापासून त्यांचे पती राजेंद्र देवरे हे सातत्याने ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करीत आहेत. शैलजा देवरे ह्या फक्त मासिक बैठकीला येतात व प्रोसेडिंगवर सह्या करून निघून जातात. एरवी ग्रामपंचायतीचा सर्व कारभार राजेंद्र देवरेंच्याच हस्तक्षेपाने मनमानी पद्धतीने सुरु आहे. राजेंद्र देवरे हे स्वतःच सरपंच पत्नीच्या नावे फॉर्म्स, बिले, बँकेचे धनादेश इत्यादींवर सह्या करतात. सदस्यांना विचारणा न करता, कल्पना न देता, बहुमताने ठराव पारित न करता परस्पर कामे केली जातात. कामांच्या निविदा उपसरपंचांच्या हजेरीत न उघडता मर्जीतील नातलगांना कामे दिली जातात. सदस्यांना दडपणात ठेवले जाते. धाकदपटशा दाखविला जातो असे पत्रपरिषदेला उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य अशोक तुळशीराम मोहिते यांनी यावेळी सांगितले. ग्रामसभेत ह्यावर आक्षेप घेतल्यास गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लावून हस्तक्षेप करीत ग्रामसभा उधळली जाते, असे गंभीर आरोप उपसरपंच चंद्रकांत देवरे यांनी केले आहेत.
चौकशी समितीने अपात्रतेची कारवाई करावी
महिला सरपंच शैलजा देवरे यांचे पती राजेंद्र देवरे यांच्या ग्रामपंचायत कारभारातील हस्तक्षेप व खोट्या सह्या करण्याबाबतची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुराव्यांनिशी केली आहे. यावर चौकशी समितीने तपासणी करूनही मात्र अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. पुरावे म्हणून दिलेल्या खोट्या सह्यांचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासले जावेत. व्हिडीओज तपासून महिला सरपंच शैलजा देवरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी. तसेच राजेंद्र देवरे यांच्यावर शासकीय कायदा व नियमांचे उल्लंघन करून गैरकारभार केल्याबाबत प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच चंद्रकांत देवरे यांनी केली आहे.