Modern Spine Procedures at Sancheti Hospital for Vertebral Fracture
मणक्याच्या फ्रॅक्चरसाठी संचेती हॉस्पिटलमध्ये आधुनिक स्पाईन प्रक्रिया
भारतात प्रथमच रिअल टाईम ओ-आर्म प्रणालीच्या मार्गदर्शनाखाली स्पाइन स्टेंटिंग – स्टेंटोप्लास्टी प्रक्रिया
Pune News पुणे : संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने पश्चिम भारतातील पहिलीच स्पाइन स्टेंटिंग प्रक्रिया / व्हर्टीब्रल बॉडी स्टेंटिंग (व्हीबीएस) प्रकिया यशस्वीरित्या केली असून ही प्रक्रिया भारतात प्रथमच स्पाइनल नेव्हिगेशन टूल ओ-आर्म च्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. संचेती हॉस्पिटलमधील स्पाइन अँड न्यूरोसायन्स युनिटचे प्रमुख डॉ.शैलेश हदगावकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने नुकतेच 51 आणि 82 वर्षांच्या महिलेवर अशा दोन प्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ.शैलेश हदगावकर म्हणाले की, एक्स रे आणि एमआरआय केल्यानंतर पाठीचा कणा तुटल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते.या रुग्णांचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे रूग्णाला असह्य वेदना होत होत्या. उभे राहणे, बसणे किंवा कोणतीही हालचाल करणे अत्यंत कठीण जात होते. 82 वर्षीय महिलेला हृदयाशी निगडीत समस्या होत्या आणि त्यांची पूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना औषधोपचार आणि इंजेक्शन देऊन वेदना कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र वेदना वाढतच चालल्या होत्या. त्यानंतर आम्ही व्हर्टीब्रल बॉडी स्टेंटिंग (व्हीबीएस) किंवा स्पाइन स्टेंटिंग प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
व्हीबीएस ही व्हर्टेबल बॉडी फ्रॅक्चरसाठी कमीत कमी छेद असणारी मणक्यासाठी पुर्नरचनात्मक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत एक फुगा पाठीच्या कण्यामध्ये टाकला जातो व त्याला मोठे केले जाते आणि नंतर स्टेंट टाकून सिमेंटने बंद केला जातो. या स्थितीमध्ये लोकल अॅनेस्थेशिया देण्यात आला होता आणि उच्च तंत्रज्ञान नेव्हिगेशन टूल ओ-आर्मच्या अंतर्गत ही प्रक्रिया करण्यात आली. ओ-आर्ममुळे प्रक्रिया करण्याची योग्य जागा, सिमेंट भरण्याची जागा आणि कमी डोसमध्ये रिअल टाईममध्ये स्कॅन करणे शक्य झाले.
डॉ.हदगावकर पुढे म्हणाले की,या प्रक्रियेनंतर रुग्णांच्या वेदना लक्षणीयरित्या कमी झाल्या आणि दोन दिवसांत त्यांना घरी सोडण्यात आले. सामान्यत: इतर पर्यायांमध्ये सिमेंट इंजेक्शन्स (वर्टेब्रोप्लास्टी),स्क्रूसह फिक्सिंगचा समावेश असतो मात्र या स्थितीमध्ये खाली पडण्याची जोखीम अधिक होती,त्यामुळे सिमेंट इंजेक्शन देणे कठीण होते. तसेच रुग्णाचे वय ही बाब लक्षात घेता शस्त्रक्रिया करणेही शक्य नव्हते.
संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती म्हणाले की,आधुनिक प्रक्रिया आणि ओ-आर्म सारखी साधने रूग्णांसाठी फायदेशीर ठरत आहेत,कारण यामध्ये कमीत कमी छेद वापरल्याने चांगल्या परिणामांसह रूग्ण लवकर बरे होऊन आपल्या दैनंदिन कामकाजात रूजू होऊ शकतात. या रूग्णांच्या बाबतीत वय आणि आरोग्याची गुंतागुंत लक्षात घेता अनेक जोखमीचे घटक होते.पण कौशल्य आणि प्रक्रियेत अचूकता दर्शविल्याबद्दल मी आमच्या टीमचे अभिनंदन करतो.
हेही वाचा