बालविवाहात सेवा देणारे आचारी, बॅण्डवाले आणि मंडपवाल्यांचा प्रशासनाने वाजवला बॅण्ड!
कायद्यानुसार बालविवाह गुन्हा असून त्यांचे उल्लंघन केल्यास बालकांचे आई, वडिल, उपस्थित सर्व वऱ्हाडी, बॅण्डवाले, मंडपवाले, विवाह लावणारे, फोटोग्राफर, आचारी या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी कोणीही बालविवाहास प्रोत्साहन देऊ नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे. आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास 1098 या क्रमाकांवर संपर्क साधावा, माहिती देण्याऱ्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवली जाते. असे जिल्हा महिला बालविकास अधिकारी शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Dhule News धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या सूचनेनुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंध कायदा व 1098 चाईल्ड हेल्पलाईन बाबत जनजागृती सुरु आहे. गावागावातील ग्रामस्थ स्वतः तक्रारीसाठी पुढे येत असल्याने बालविवाह थांबविण्याचे प्रमाण सुध्दा वाढलेले आहे. परंतु काही ठिकाणी कायद्याच्या विरोधात जाऊन कोणी बालविवाहास प्रोत्साहन देत असेल तर अशा वेळी कायद्याचा बडगा उगारावा लागतो. असाच प्रकार धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावात घडला आहे.
पुरमेपाडा ता. जि. धुळे येथे 13 जून, 2023 रोजी बाल विवाह होत असल्याची तक्रार चाईल्ड लाईन 1098 वर प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस यंत्रणा, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रतिनिधी, स्थानिक यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पोहोचल्यावर गावातील व इतर गावातील व्यक्ती असा जवळपास दोनशे अडीचशे लोकांचा जमाव उपस्थित होता. सदरचा विवाह होण्यासाठी जमाव प्रयत्न करत होता. मात्र प्रशासनाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला व सदर बाल विवाह रोखण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती, धुळे हे सुध्दा घटनास्थळी पोहोचले. जमाव मोठ्या प्रमाणात विरोध करू लागला असता अधिकची कुमक मागविण्यात आली.
याठिकाणी कुटुंब बाल विवाह थांबविण्यास तयार होते. परंतु गावातील इतर व्यक्ती जास्त प्रमाणात विरोध करत होते. शेवटी मुलाचे व मुलीचे आई-वडील, आजी-आजोबा व विरोध करणारे लोक यांना शिक्षेविषयी व बालविवाहाचे मुलीवर होणारे भविष्यातील दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात येऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्यात आले.बाल विवाह हमीपत्र लिहून थांबविण्यात आला. मुलीला तिच्या गावी रवाना केले त्यानंतरही पुन:श्च बालविवाह करू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिलेल्या आदेशान्वये ग्रामपंचायतीने विवाह कार्यात सहभागी असणाऱ्या मंडपवाले, बॅण्डवाले, आचारी यांना कुठलीही खात्री न करता विवाह कामी सेवा दिल्यामुळे कारवाई करण्याबाबतच्या नोटीसा देण्यात आल्या.
हेही वाचा