40 लाखांचा रस्ता 10 लाखातच केला म्हणून पडले खड्डे, शिवसैनिक आक्रमक
Dhule धुळे : येथील महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारांनी हातमिळवणी करून भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. 40 लाख रुपयांचा निधी असताना केवळ 10 लाख रुपयांचा रस्ता तयार केला. उर्वरित रक्कम खाऊन गेले, असा आरोप शिवसेनेचे युवा नेते संदीप चौधरी यांनी केला.
शहरात प्रभाग क्रमांक 11 मध्ये अरिहंत जैन मंगल कार्यालय ते विश्वकर्मानगरपर्यंत झालेल्या रस्त्याचे काम अतीशय निकृष्ट दर्जाचे असून, या कामात महानगरपालिकेने केलेल्या गैरव्यवहाराची शिवसैनिकांनी पोलखोल केली. काही महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली. मोठमोठे खड्डे पडले. या विरोधात अनेक नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. 30 ते 40 लाख खर्च करून मनपा प्रशासनाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे चार ते पाच महिन्यातच सिमेंट उखडून वाळू व खडी उघडी झालेली आहे.
नव्या रस्त्याला फक्त 2 ते 3 महिन्यात खड्डे पडलेच कसे, रस्त्याच्या टाळूवरची लोणी कोणी खाल्ली तर नाहीना, असे प्रश्न यावेळी नागरिकांनी विचारले. खड्डे वाचविताना वाहनधारकांचे छोटे-मोठे अपघातही या रस्त्यावर होत असतात. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून, टक्केवारीत गुंतलेल्या मनपाने याकडे लक्ष द्यावे. ठेकेदाराची चौकशी करून रस्त्याची दुरुस्ती करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून या खड्ड्यांची व रस्त्याची वसुली करावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
रस्त्याची दुरुस्ती त्वरीत केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक पुरुषोत्तम जाधव, आबा भडागे, पंकज भारस्कर, संदीप चौधरी, संजय जगताप,अशोक तेले, मनोज शिंदे, नाना खेमणार, गौरव पाटील, देवा भांडारकर, प्रविन चौधरी, सागर निकम यांनी दिला. यावेळी स्थानिक महिला, नागरिक, वाहनधारक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.