‘शिरपूर पॅटर्न’चा खरा चेहरा, आदिवासी महिलेच्या प्रसुतीसाठी बांबुची झोळी अन् सहा किलोमीटरची पायपीट
आदिवासी महिलेच्या प्रसुतीसाठी बांबुची झोळी अन् सहा किलोमीटरची पायपीट
नंबर वन महाराष्ट्र टीम
हि घटना आहे विकासाचे माॅडेल म्हणून नावारूपाला आणलेल्या शिरपूर तालुक्यातील. सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ता नाही म्हणून एका आदिवासी महिलेला प्रसुतीसाठी रूग्णालयात नेण्याकरिता बांबुच्या झोळीत टाकून तिच्या नातेवाईकांना सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली. दुसऱ्यांदा घडलेल्या अशा घटनेमुळे ‘शिरपूर पॅटर्न’च्या विकासाचा खराखुरा चेहरा समोर आला.
‘शिरपूर पॅटर्न’चा फुगा फुटला : शिरपूर तालुक्याचे विकासपुरुष आमदार अमरिश पटेल गेल्या ४० वर्षांपासून आमदार आहेत. ते मंत्री देखील होते. शिरपूर मतदार संघ आदिवासी राखीव झाल्यानंतर त्यांनी त्यांचे जवळचे कार्यकर्ते काशिराम पावरा यांच्या माध्यमातून विधानसभेची आमदारकी आपल्या ताब्यात कायम ठेवली आणि स्वतः विधानपरिषदेवर निवडून येत आहेत. सत्तेच्या या प्रदीर्घ काळात त्यांनी शिरपूरचा सर्वांगिण विकास केला? ‘मेन स्ट्रीम मीडिया’ला हाताशी धरून ‘शिरपूर पॅटर्न’ नावाचे विकासाचे मॉडेल राज्यभर नावारूपाला आणले. परंतु विकासाचे हे माॅडेल केवळ शहरी वस्तीपुरतेच मर्यादित राहिले. सातपुड्याचा आदिवासी दुर्गम भाग स्वातंत्र्याआधी जसा होता तो आजही तसाच आहे. शिरपूरचे रस्ते गुडगुडीत आणि आदिवासी पाड्यांना रस्तेच नाहीत. शिरपूरच्या नळांना मिनरल वॉटर आणि आदिवासी पाड्यांमध्ये भर उन्हात महिलांची पाण्यासाठी पायपीट, शिरपूरच्या पंचतारांकित ‘निम्स’मध्ये देशभरातील श्रीमंतांच्या शिक्षणाची सोय आणि आदिवासी पाड्यांमध्ये अंगणवाडी व झेडपी शाळांच्या धड इमारतीही नाहीत. शिरपूरला सोन्याचा कारखाना आणि आदिवासी पाड्यांमध्ये प्रथमोपचारासाठी पुरेशा आरोग्य सुविधाही नाहीत. शिरपूर पॅटर्नच्या बंधाऱ्यांचे विधीमंडळात कौतुक होताना आदिवासी शेतकरी आजही सिंचन विहिरीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवताहेत, अशी परिस्थिती आहे. याला अजिबात विकास म्हणता येणार नाही. कारण केवळ शहरी वस्तीचा थोडाफार विकास झाला आहे. आदिवासी दुर्गम भाग आजही भकास आहे. शिक्षणासाठी धुळे शहरात येताना चार शाळकरी मुलांचा महामार्गावर अपघाती मृत्यू होतो आणि मुक्काम पोस्ट मुंबई असलेले विकासपुरुष फिरकतसुध्दा नाहीत, अशी मानसिकता आहे. त्यामुळे विकासपुरुषांचा ‘शिरपूर पॅटर्न’चा फुगा या घटनेमुळे फुटला आहे.
आदिवासींची एकहाती सत्ता : सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम भागात आदिवासींच्या नशिबी अजुनही विकास नाहीच. एका गरोदर महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याने तिला बांबूच्या झोळीत टाकून नातेवाईकांना सहा किलोमीटर पायपीट करीत रुग्णालय गाठावे लागते. तेही अशा क्षेत्रातून की ज्या क्षेत्रात आदिवासींची एकहाती सत्ता आहे. आदिवासी विकास विभागाचे मंत्री असलेले विजयकुमार गावित आदिवासी आहेत. या मतदार संघाच्या खासदार असलेल्या त्यांच्या कन्या हीना गावित या आदिवासी आहेत. या मतदार संघाचे आमदार काशिराम पावरा हे देखील आदिवासी आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील आदिवासी नसल्या तरी त्या महिला आहेत. मंत्री आणि खासदार दोन्हीही डाॅक्टर आहेत. असे असताना रस्ता आणि आरोग्य सुविधा नाहीत म्हणून एका आदिवासी महिलेला बांबुच्या झोळीत टाकून सहा किलोमीटरची जिवघेणी पायपीट करावी लागणे म्हणजे शासन-प्रशासनाची आणि आदिवासी सत्ताधाऱ्यांची नामुष्की आहे. अशावेळी ‘शासन आपल्या दारी’सारख्या कार्यक्रमांना काहिही अर्थ उरत नाही.
काय आहे घटना? : शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथे रस्ता नाही. येथील एका महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. पक्का रस्ता नसल्याने रूग्णवाहिका किंवा अन्य कोणतेही वाहन येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे बांबूच्या दोन मोठ्या दांड्यांना चादर गुंडाळून त्याची झोळी तयार केली. आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या या स्ट्रेचरमध्ये टाकून त्या महिलेला तीन किलोमीटर अंतरावरील गुऱ्हाळपाणी येथे नेण्यात आले. प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागली. निशाणपाणी ते थुवाणपाणी व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी असे सहा किलोमीटरचे अंतर पायपीट करीत पार करावे लागले. त्यानंतर तेथून या महिलेला रूग्णवाहिकेने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सुदैवाने या महिलेची सुरक्षितरित्या प्रसुती झाली. बाळ आणि बाळंतीण दोन्हीही सुखरूप आहेत. ग्रामपंचायत सदस्य गुलबा पावरा, सिकना पावरा, कावसिंग पावरा, आशा सेविका सुरमीबाई पावरा, सतीलाल पावरा यांनी या महिलेला झोळीने आणण्यास सहकार्य केले.
जि. प. सीईओंच्या भेटीनंतरही हालच : काही महिन्यांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी या क्षेत्राला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देखील थुवाणपाणीपर्यंत पायी चालत जावे लागले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना रस्त्याची मागणी केली. मात्र अद्यापही रस्त्याबाबत काही कार्यवाही न झाल्याने आदिवासी नागरिकांचे हाल कायम आहेत. या दुर्गम भागात रस्ते तयार करावेत, अशी मागणी आग्रही आहे.
ग्रामपंचायतीचे माजी सदस्य काय म्हणतात? : आमच्यासाठी रस्ता देखील जीवनावश्यकच आहे. गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दहा ते बारा खेडे येतात. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासुन रस्त्याची मागणी करत आहोत. मात्र याबाबत कोणीही गांभीर्याने विचार केला नाही. या क्षेत्रात त्वरित रस्ते करण्याची आवश्यकता आहे.
– राजेंद्रसिंग पावरा, माजी ग्रा. पं. सदस्य, गुऱ्हाळपाणी
हे काही पहिल्यांदा घडले नाही! : 14 मे 2020 रोजी अशीच घटना थुवाणपाणी येथे घडली होती. या घटनेचे वृत्त दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर आमदार काशीराम पावरा यांनी गुऱ्हाळपाणी येथे येऊन एका दिवसात एक डॉक्टर व नर्सची नियुक्ती करून हा प्रश्न सोडवला होता. परंतु त्या घटनेला तीन वर्षांचा काळ लोटला तरी थुवानपाणी व निशाणपाणी भागात रस्ता झाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एका महिलेला झोळीत टाकून दवाखान्यात आणावे लागले.