अवैध धंद्यांचे खापर एलसीबीवर, पीआय हेमंत पाटील यांची तडकाफडकी बदली
Dhule News धुळे : अवैध धंद्यांचे खापर एलसीबीवर फोडण्यात आले असून, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शहरालगत साक्री रोडवर शेतशिवारामध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या अवैध क्लबवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने छापा मारून तब्बल 31 जुगारींवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून जुगार खेळण्याच्या साहित्यासह 30 लाखांचा मुद्देमालही जप्त केला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणामुळे धुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून, धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
धुळे तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जुलै रोजी रात्री नऊ वाजता हा छापा टाकण्यात आला. महिंदळे शिवारात असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या मागील परिसरात 200 मीटर अंतरावर असलेल्या हिम्मत शेवाळे यांच्या पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये जुगाराचा क्लब सुरू होता. या क्लबवर पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई केली.
30 लाखांचा मुद्देमाल जप्त : जुगाराच्या अड्ड्यावरून पोलिसांनी तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यात एक लाख 56 हजार 730 रुपये रोख, एक लाख 41 हजार रुपये किमतीचे 30 मोबाईल फोन 14 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 23 मोटरसायकली बारा लाख रुपये किमतीची दोन चार चाकी वाहने 38 हजार रुपये किमतीचे टेबल व खुर्च्या असा एकूण 30 लाख 730 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या पत्र्याच्या शेडमध्ये हा क्लब सुरू होता त्याचा मालक हिम्मत शेवाळे हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एलसीबी पीआयची तडकाफडकी बदली आणि अवैध धंदे बंदचे आदेश
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नाशिक येथील पथकाने धुळ्यात येऊन कारवाई केल्याने धुळे पोलिसांची चांगलीच झोप उडाली. रात्री कारवाई झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषद घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. तसेच अवैध धंद्यांबद्दल माहिती मिळाली तर संबंधित पोलीस ठाण्यात किंवा 112 वर कॉल करावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. तसेच त्यांनी आपला मोबाईल क्रमांकही जाहीर केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर ठपका ठेवला असून, त्यांची नियंत्रण कक्षामध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.