भुसावळचे पोलीस निरीक्षक धुळे एसीबीच्या जाळ्यात, तीन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
Jalgaon News जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ येथील बाजारपेठेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह काॅन्स्टेबल आणि खासगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. याप्रकरणी मलकापूर जि. बुलढाणा येथील तरूणाने तक्रार केली होती.
पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. राहुल बाबासाहेब गायकवाड (पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे भुसावळ जिल्हा जळगाव), पोलीस नाईक तुषार पाटील (बाजारपेठ पोलीस ठाणे भुसावळ जि जळगाव), खाजगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला (हनुमान वाडी भुसावळ जिल्हा जळगाव) या तिघांना धुळे एसीबीने अटक केली आहे.
या कामासाठी मागितली लाच
यातील तक्रारदार यांच्या मित्रास भुसावळ बाजारपेठ येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी लाच मागितली होती. पोलीस निरीक्षक आणि काॅन्स्टेबल यांच्या सांगण्यावरून व प्रोत्साहित केल्यावरून खासगी पंटरने लाच स्वीकारली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे सापळा अधिकारी पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील, हवालदार राजन कदम, कॉन्स्टेबल संतोष पावरा, रामदास बारेला, हवालदार चालक सुधीर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या पथकाला शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक), माधव रेड्डी (अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक), नरेंद्र पवार (वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक) यांचे मार्गदर्शन लाभले.
एसीबीकडे तक्रार करा
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे संपर्क करावा. दुरध्वनी क्रमांक- 02562224020
8888881449, टोल फ्री क्रमांक १०६४