प्रत्येक वेळी महिलांनाच शिक्षा का?
मणिपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी जी घटना घडली तिचा निषेध करण्यास, धिक्कार करण्यास शब्द अपुर्ण पडत आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. जगात कुठेही युध्द, जातीय हिंसाचार, अराजकतासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची मोठी किंमत ही महिलांनाच चुकवावी लागले. जमाव प्रक्षुब्ध होतांना, दोन गटात वाद उफाळतांना प्रत्येक वेळी महिलांनाच त्याची शिक्षा का? महिलेवर बलात्कार करुन काय सिध्द केले जाते? बेटी बचाओ… अभियान हाती घेणाऱ्या सरकारसमोर महिलांवरील आदिम अत्याचाराची घटना समोर यावी यापेक्षा या देशाचे दुदैव ते काय?
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये दोन समुदायात उफाळलेल्या हिंसाचारात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. मणिपूरच्या जातीय हिंसाचाराचा असा वानवा कधीच बघितला नाही. जातीयतेचे विष प्रत्येकाच्या शरीरात भिनले आहे. महिला, आबालवृध्द, तरुण मिळेल त्याला भोसकून त्याची हत्या करणारा खेळ कधी व कुठे थांबेल हे आज तरी कुणी खात्रीने सांगू शकत नाही. घरांची राखरांगोळी करणारा हिंसाचार मन हेलवून टाकणारा आहे. महिलांना टार्गेट करुन त्यांचा जीव घेणे कुठल्या संस्कृतीत बसते कळायला मार्ग नाही.
अनेक वर्षापासून सोबत राहणारे कुकी व मैतेई यांच्यातील परस्पर विश्वास एकाएकी उठलास कसा? विषारी बियांची पेरणी कुणी केली? हा सगळा तपासाचा भाग मागे पडला आहे असे जाणवते. सरकार यासंदर्भात जनतेला अंधारात ठेवत आहे. केंद्राने स्पष्टवादी व्हावे. मात्र सरकार मणिपूर जळू देत आहे. बघ्याची भूमिका घेत आहे. त्याचीच परिणीती म्हणुन दोन महिलांना विवस्त्र करुन, त्यांची धिंड काढुन, जमावाने सामुहिक बलात्कार केला. हा बलात्कार महिलांवर झालेला नसुन स्वत:ला सभ्य, सुसंस्कृत व चारित्र्यवान म्हणवुन घेणाऱ्या समाजावर झाला आहे. मणिपूरमधील त्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृतांनी केवळ त्या भगिनींनाच विवस्त्र केले नाही, तर येथील संपूर्ण व्यवस्थेसही नग्न केले आहे. दुहेरी इंजिन सरकारचा वारंवार जयघोष करुन मते लुटणाऱ्या राजकीय लुटमारांनी सत्ता तर प्राप्त केली, पण त्यांच्याकडे आज मणिपूर जळत असतांना ते विझविण्याचे सामर्थ्य मात्र दिसत नाही. भाजपा केंद्रात व राज्यात सत्तास्थानी असतांना हतबल दिसत आहे.
घडलेल्या घटनेस जितका जमाव दोषी आहे तितकाच किंवा त्यातुनही अधिक सरकारी व्यवस्था दोषी आहे. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या पोलीसांची भुमिका संशयास्पद दिसुन येते. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसा होत असतांना पोलीसांना त्यावर नियंत्रण मिळविता येत नाही. सरकारी शस्त्रागारामधून आंदोलक शस्त्र लुटून नेतात. पोलीस काहीच करत नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे जेव्हा लाचार, निरर्थक म्हणुन सिध्द होतात तेव्हा अशा हिंसा घडत राहतात. पोलीस जनतेचे रक्षण करु शकत नाही हे यावरुन सिध्द होते. अशा पोलीसांना कर्तव्यमुक्त का करु नये?
अत्याचार झाल्यावर देखील कसाबसा जीव वाचवत या महिला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र ती नोंदवली जाते तब्बल एक महिन्यानंतर. घटनेच्या दोन महिन्यानंतर या प्रकरणी एकाही आरोपीस साधी अटकही होत नाही. याला काय म्हणावे? महत्वाची बाब म्हणजे मणिपूरमधील हा एकमेव चलचित्र (व्हिडीओ) प्रसारीत झाला आहे. गेल्या तीन महिन्यात तेथे अजुन किती महिलांवर असे अत्याचार झाले आहे? याची काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ती समोर आल्यास मणिपूरमध्ये महिला किती ‘असुरक्षित’ आहे याची सत्य परिस्थिती कळेल.
अत्याचार झालेल्या पिडीतांनी प्रसार माध्यमांसमोर आपबिती कथन करतांना सांगितले की, जमाव त्यांच्या गावावर हल्ला करत होता तेव्हा पोलीसही हजर होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तेथून सोबत घेतलं. काही अंतरावर गेल्यावर पोलिसांनी महिलांना रस्त्यावर जमावाबरोबर सोडून दिलं. त्यांना पोलिसांनीच जमावाच्या हवाली केलं. तर दुसऱ्या बाजुस, अशा घाणेरड्या कृत्याने देशाची इज्जत जात आहे. 140 कोटी लोकांची मान लाजेने खाली गेली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. कठोर पावलं उचला. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो की मणिपूरची. कायदेशीर कारवाई होईलच! स्त्रीयांचा नेहमीच सन्मान राहिला पाहिजे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कायदा आपलं काम पाहिलंच, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. राज्यात आणि केंद्रात सत्ता तर भारतीय जनता पक्षाचीच आहे हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजेत. येथे तर कायदा राबविणारे, त्याची अंमलबजावणी करणारे महिलांना जमावाच्या हवाली करत आहेत. मग गुन्हेगारांवर कारवाई करणार कोण? आणि जर कारवाई करायचीच होती तर अशी मोठी घटना घडण्याची वाट पाहत होता काय? मग गेले तीन महिने काय केले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे पंतप्रधानांनी सोयीस्करपणे टाळले.
देशाच्या राष्ट्रपती पदावर एक महिला विराजमान आहे. एका बाजूला ऐतिहासिक अशा ‘चांद्रयान-3’ मोहिमेचे नेतृत्व एका भारतीय महिलेने केले, तर त्याच भारताच्या एका भागातील महिलांची नग्न करून धिंड काढली जात आहे, त्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत आणि तरीही पुराव्यांच्या अभावी किंवा अन्य काही कारणानिमित्त गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. भारताच्या फाळणीपूर्व काळापासूनची ही वस्तुस्थिती भारत स्वतंत्र होऊन 76 वर्षे होतील, तरीही बदलेली नाही, असे का? यात अजून एक बाजू दिसते ती म्हणजे समाज यामध्ये बघ्याची भूमिका घेतो. भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये भर रस्त्यावर एका मुलीला दगडाने ठेचून मारले, तेव्हा समाज बघत राहिला, महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमधील मुलीवर कोयत्याने वार होताना समाज बघत राहिला. समाज स्वत:ला व्यक्त करणे विसरला आहे काय? स्त्री-पुरुष समानतेच्या मूलभूत गोष्टीच आज समाज विसरला आहे.
शेवटी एकच म्हणावेसे वाटते, ज्या देशात अथवा राज्यात स्त्रीयांचा अपमान होतो, तिच्यासोबत व्यभिचार केला जातो, त्या देशाचा-राज्याचा सर्वनाश अटळ असतो. आज महिलांनी सक्षम आणि साक्षर होण्याची गरज आहे. साक्षरतेचे उपयोजन करणेही तेवढेच आवश्यक आहे. अशा पार्श्वभूमीवर दुर्बल नव्हे तर सबल, सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
लेखिका : सीमाताई मराठे, धुळे. मो. 9028557718