पुरूष जातीला गर्भाशय नाकारण्याच्या मानसिकतेपर्यंत त्या आल्या आहेत… मणिपूर हिंसाचाराविरूध्द महिलांच्या भावना अतीशय तीव्र आहेत…
Dhule News धुळे : पुरूष जातीला गर्भाशय नाकारण्याच्या मानसिकतेपर्यंत त्या आल्या आहेत. मणिपूर हिंसाचाराविरूध्द महिलांच्या भावना अतीशय तीव्र आहेत. महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मंगळवारी विविध सामाजिक संघटनांच्या महिला एकत्र आल्या होत्या. या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मणिपूर दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आग्रही मागणीही केली.
सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई भोसले, प्रभाताई परदेशी, गीतांजलीताई कोळी यांनी रोष व्यक्त केला. तर सामाजिक कार्यकर्त्या रत्ना पाटील यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. महिलांवर अत्याचार करण्याची परिसीमा गाठणाऱ्या पुरूष जातीला आम्ही आमच्या गर्भाशयात जागा का द्यावी, असा संतप्त सवाल त्यांनी केला. धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यां महिला भगिनींनी एकत्र येत मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचाराचा निषेध व्यक्त करत दोषींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी केली. महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात कठोर कायदे करा अशा आशयाचे निवेदन दिले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या मिनाताई भोसले, जयश्रीताई पाटील, रत्नाताई पाटील, विरांगना झलकारीबाई संस्थेच्या गितांजली कोळी, इंदिरा महिला मंडळाच्या प्रभाताई परदेशी, खान्देश हित संग्राम संघटनेच्या अनिता बैसाणे, किरणताई पाटोळे आदी महिला उपस्थित होत्या.
काय आहे प्रकरण?
१९ जुलै सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. १८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला.
ज्या दोन महिलांवर अत्याचार करून, त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, त्या महिला कुकी-झोमी समुदायाच्या असल्याचे सांगण्यात येते. खांगपोकी या डोंगराळ जिल्ह्यात या समुदायाचे प्राबल्य आहे. दोन महिलांपैकी एकीचे वय २०; तर दुसरीचे वय ४० असल्याचे कळते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अत्यंत विदारक परिस्थिती विषद करणारा असून, या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पुरुषांचा जमाव या महिलांना बळजबरीने शेतात नेत असताना त्यांच्या शरीराची विटंबना करताना दिसत आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडीओ मागच्या बुधवारी व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी मागच्या गुरुवारी पहिल्या आरोपीला अटक केली. या व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून तपास केला जातो आहे. त्यासाठी शोध मोहीम सुरु आहे. आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे अशीही माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलीस इतर आरोपींना अटक करत आहेत.
हेही वाचा