एक दिवसाआड पाणीपुरवठा हा देखील जुमला तर नव्हता ना? महापौर हे काय म्हणाल्या?
धुळे : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत भाजपचे मंत्री, खासदार, महानगरप्रमुख, महापौर आणि अधिकाऱ्यांमध्ये अजिबात ताळमेळ नसल्याचे दिसते. त्यामुळे धुळेकर जनता कमालीच्या संभ्रमात आहे. हा संभ्रम दूर व्हावा यासाठी खासदारांच्या आदेशाने भाजपचे महानगरप्रमुख आणि महापौरांनी प्रसारमाध्यमांसह योजनेची पुन्हा पाहणी केली. परंतु संभ्रम अधिक वाढला.
एक दिवसाआड की तीन दिवसाआड? : महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्यावेळी एका जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांनी, ‘महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात दिली तर एका वर्षाच्या आत धुळेकरांना दररोज पाणीपुरवठा केला जाईल’, असे आश्वासन दिले होते. भाजपचा तसा जाहिरनामाच होता. पण सत्तेवर आल्यानंतर एका वर्षात काय तर चार वर्षे उलटली तरी अक्कलपाडा योजनेतून पाणीपुरवठा झाला नाही. कालांतराने सत्ताधाऱ्यांनी घुमजाव करीत, ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल’, अशी सुधारणा केली. खासदार डॉ. सुभाष भामरे, पक्षाचे माजी महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांनी गेल्या चार महिन्यांत दोनवेळा अक्कलपाडा योजनेची पाहणी करून टेस्टींग घेतली आणि एका महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले. पण आजपर्यंत तसे घडले नाही. मुळात तोपर्यंत जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले नव्हते. आता महापौर प्रतिभा चौधरी यांनी, ‘लवकरच दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल’, असे म्हटल्याने संभ्रम वाढला आहे. (Video पहा)
नवीन जिल्हाध्यक्षांनी सत्य स्वीकारले! : खासदार आणि माजी महानगरप्रमुखांनी एक दिवसाआड पाण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देण्याचा सपाटा सुरू ठेवला होता. दरम्यान, भाजपचे नवीन महानगरप्रमुख गजेंद्र अंपळकर यांनी मात्र सत्य स्वीकारल्याचे दिसले. अंपळकर यांच्यासह महापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अक्कलपाडा योजनेच्या प्रगतीची पुन्हा पाहणी केली. ‘एक दिवसाआड पाणी नक्की कधी मिळेल हे सांगता येणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु ठेकेदाराची दिरंगाई व महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम लांबल्याची टीका त्यांनी केली. तसेच ‘तारीख पे तारीख’चे खापरही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर फोडले. योजनेचे काम तातडीने मार्गी लावण्याची सूचना त्यांनी केली.
आयुक्त काय म्हणाले? : महापालिकेचे आयुक्त म्हणाले की, जानेवारी महिन्यात योजना सुरू होणे अपेक्षित होते. पण तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काम लांबले. आता हे काम अंतिम टप्प्यात असून, एक पंप सुरू झाला आहे. लवकरच सर्व पंप सुरू केले जातील. त्यासाठी ३३ केव्ही सबस्टेशन उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार : या योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी किती वीज लागेल याचा अभ्यास न करता अधिकाऱ्यांनी या योजनेला तांत्रिक मंजुरी दिल्याचे दिसते. मुळात इतक्या मोठ्या योजनेसाठी स्वतंत्र सबस्टेशनची आवश्यक असल्याचा विचारच झाला नसावा. असे असताना ‘पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून, सबस्टेशनचे काम झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू होईल’, अशी खोटी माहिती गेले तीन महिने धुळेकरांना दिली जात होती. मुळात पालिकेने सबस्टेशनचे कोणतेही काम हाती घेतले नव्हते. महावितरण कंपनीच्या ११ केव्ही सबस्टेशनमधून उसनवारीने वीज घेतली आणि अक्कलपाडा योजनेचा पाणीपुरवठा सुरू केला. पण या वीजेवर केवळ एकच पंप चालू झाला. एकाचवेळी सर्व पंपांचा पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ३३ केव्ही सबस्टेशनची आवश्यकता असल्याचा साक्षात्कार अधिकाऱ्यांना झाला आणि हे सबस्टेशन बांधण्यासाठी त्यांनी धावपळ सुरू केली आहे. म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे आता एक दिवसाआड पाणीपुरवठा शक्य आहे की तीन दिवसाआड हे या सबस्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतरच कळणार आहे. तोपर्यंत पुढारी आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही.
हेही वाचा