धुळे जिल्ह्यात दोन बकरी चोरांना पकडले
Dhule News धुळे : जिल्ह्यातील साक्री येथे बकरी चोरून पळ काढणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी पकडले असून, त्यांना कोठडीचा रस्ता दाखविला आहे. रोहन उर्फ बंटी भरत घरटे (१९), सचिन नामदेव महाजन (२१) अशी दोघांची नावे आहेत. दोन्ही संशयित सामोडे ता. साक्री येथील रहिवासी आहेत.
साक्री शहरात एका वकिलांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत मेंढ्या आणि बकऱ्या चरत असताना या दोघांनी एक बकरी उचलून दुचाकीवर टाकली आणि पळ काढला. २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमाराला ही घटना घडली.
हा प्रकार लक्षात येताच मेंढपाळ साहेबराव तानु कारंडे (३०, रा. अंबापूर, ता. साक्री) यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु ते सापडले नाहीत. त्यानंतर कारंडे यांनी २८ जुलै रोजी पोलीस ठाण्यात जाऊन दोन्ही चोरांची नावे सांगितली आणि फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १० हजार रूपये किमतीची बकरी देखील हस्तगत केली. या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल बी. एम. रायते करीत आहेत.
दापुरा गावातून ९ बकऱ्या चोरल्या
दरम्यान, धुळे तालुक्यातील सोनगीर गावाजवळ असलेल्या दापुरा या पूनर्वसन गावातून ९ बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. २७ जुलै रोजी रात्री ही चोरी झाली. याप्रकरणी योगराज प्रल्हाद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८ जुलै रोजी सोनगीर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वानखेडे करीत आहेत.