… तर संभाजी भिडेंचा पॅंथर स्टाईलने बंदोबस्त करू!
Dhule News धुळे : महापुरुषांना शिव्या देणारा संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीचा ताबडतोब बंदोबस्त केला नाही तर पॅंथर स्टाईलने ठोकून बंदोबस्त केला जाईल. त्यामुळे या प्रवृत्तीला त्वरित आवरा, असा गर्भित इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी धुळ्यात दिला.
भीमस्मृती मेळाव्यानिमित्त ते 31 जुलै रोजी धुळ्याला आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचे दौरे रद्द करावेत, त्यांच्याविरुद्ध युएपीए कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांना देशद्रोही घोषित करावे, अशी मागणी दीपक केदार यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मनोहर कुलकर्णी यांच्यामार्फत सामाजिक सलोखा दूषित करणारे वक्तव्य केले जात असून, स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महापुरुषांचा अवमान केला जात आहे आणि त्यांना पाठीशी घालण्याचे काम या व्यवस्थेतील गृहमंत्री स्वतः करत आहेत, असा आरोप त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. भिडे यांच्यावर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल झालेला असताना त्यांना अटक होत नाही. भीमा कोरेगाव दंगलीचे मास्टरमाईंड असलेल्या भिडेंमुळे या दंगलीचे पडसाद देशासह जगात उमटले होते. हजारो मोर्चे निघाले होते. असे असताना संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे ते सरकारचे आणि गृहमंत्र्यांचे कोण लागतात?, पोलीस त्यांना अटक करायला का घाबरतात?, राष्ट्रगीत स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रध्वज मानत नाही असे देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या भिड्यांवर गुन्हा का दाखल होत नाही, असे प्रश्न दीपक केदार यांनी उपस्थित केले. असे वक्तव्य एखाद्या दलित, मुस्लिम अथवा आदिवासी नेत्यांनी केले असते तर या व्यवस्थेने त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करायला अजिबात विलंब केला नसता.
एनआयए फक्त दलित मुस्लिमांच्या कार्यालयांवर छापे मारणारी संस्था आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि संभाजी भिडे यांच्या कार्यालयावर छापा मारावा अशी मागणी केली. संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालावी लागली अशा पद्धतीचे वक्तव्य या प्रवृत्तीने केले आहे. महात्मा गांधींना गोळ्या झाडून मारले. त्यांना मारल्यानंतरही त्यांचे विचार मरत नाहीत म्हणून त्यांच्या कौटुंबिक इतिहासाला गोळ्या मारण्याचे काम या प्रवृत्तीने सुरू केले आहे. त्यांच्या वडिलांचा इतिहास काढून भारत माता की जय म्हणत त्यांच्या मातेवर चारित्र्याचा संशय घेत त्यांचा अवमान करीत आहेत.
मणिपूर मधील घटनेवर बोलताना दीपक केदार म्हणाले की, मणिपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये आंदोलने सुरू झाली होती. उद्रेक होणार होता. परंतु जनमानसाचे मन भरकटवण्यासाठी, मणिपूरचा मुद्दा बाजूला करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक संभाजी भिडे यांना असे वक्तव्य करायला लावले असा आरोपही त्यांनी केला.
अजित पवार, भुजबळ यांनी राजीनामा द्यावा
छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी त्वरित सत्तेतून बाहेर पडावे आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन उभारावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समता हा शब्द केवळ मतांपुरता वापरला जातो का असा टोलाही त्यांनी लगावला. अजित पवार भिडे यांचा निषेध करणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ब्रिटिशांच्या विरोधात लढून मिळविलेले स्वातंत्र्य या मनुवाद्यांना मान्य नाही. त्यामुळे हे मनुस्मृतीचे राज्य आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी देशात अराजकता माजविली जात आहे. देशातील बहुजनांना गुलाम करण्यासाठी अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिले जात आहेत. परंतु महापुरुषांचा अवमान करून विचार संपत नसतात असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा