बाबासाहेब पोळा सणाच्या वादाचा सामाजिक खटला लढण्यासाठी धुळ्यात आले होते आणि जिंकलेही होते
Dhule धुळे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन कामकाजानिमित्त सन १९३७ साली धुळ्यात आले होते. त्यांच्या धुळे दौऱ्यातील ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे ३१ जुलै रोजी धुळ्यात भीमस्मृती मेळावा झाला. या महामेळाव्याला महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यासह देशभरातील हजारो भीमसैनिकांनी उपस्थित राहून अभिवादन केले. विशेष म्हणजे या महामेळाव्याचा कोणीही आयोजक नसतो.
लांडोर बंगल्यावर उसळला जनसागर : धुळे शहरालगतच्या किल्ले लळिंग वन क्षेत्रातील ब्रिटिशकालीन लांडोर बंगल्यावर बाबासाहेब थांबले होते. बंगल्याच्या ज्या खोलीत बाबासाहेब थांबले त्या खोलीत पुतळा बसवून स्मारक उभारले आहे. या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, आमदार फारुक शाह, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक बुध्द घेऊन अभिवादन केले. अभिवादनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. मुंबई-आग्रा महामार्गाची एका दिशेची वाहतूक वळविण्यात आली होती.
संदेश भूमीवर कार्यक्रमांची रेलचेल : धुळे शहरात बस स्थानकाजवळ असलेल्या ब्रिटिशकालीन विश्रामगृहात देखील बाबासाहेब थांबले होते. बहुजन समाज पार्टीचे नेते आनंद सैंदाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या बंगल्याला संदेश भूमी असे नाव दिले असून, या ऐतिहासिक स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा अशी मागणी मंत्रालय स्तरावर लाऊन धरली आहे. संदेश भूमीवर दर वर्षीप्रमाणे महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी सकाळी अभिवादन केले. सायंकाळी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाची रॅली काढण्यात आली. त्यानंतर शाहिर संभाजी भगत यांचा विद्रोही शाहिरी जलशाचा कार्यक्रम झाला.
बाबासाहेबांच्या धुळे दौऱ्याचा इतिहास असा : पोळा सणात कोणाचा बैल पुढे असावा या वादावरून धुळे जिल्ह्यातील शिरपूर न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर युक्तीवाद करण्यासाठी ॲड. प्रेमसिंग तंवर नावाच्या वकिलांनी खटला चालविण्यासाठी बाबासाहेबांना धुळे शहरात बोलाविले होते. हा खटला ते जिंकले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी २९, ३० व ३१ जुलै १९३७ रोजी तीन दिवस लळींग कुरणातील लांडोर बंगला, तसेच धुळे बस स्थानकाशेजारील ट्रॅव्हलर्स बंगला (सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह क्रमांक दोन) येथे मुक्काम केला होता. यावेळी डॉ.ज्ञबाबासाहेब आंबेडकरांनी धुळे जिल्हा व शहराची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्या काळात शहरातील विजयानंद चित्रमंदिरामध्ये जाहीर सभा घेऊन बाबासाहेबांनी जनतेला मार्गदर्शन केले.
धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग गावातील विश्वासू लाडके सेवक पुनाजी लळींगकर यांना ते भेटायला गेले. त्यांच्या घरी भोजन केल्यानंतर लळींग कुरणाच्या डोंगरावरील लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. या तीन दिवसांच्या मुक्कामात बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना उपदेश व मार्गदर्शन केले. तसेच बाबासाहेबांनी शहरातील गरुड वाचनालय आणि इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळालाही भेट देऊन अभिप्राय नोंदविला. त्याचा आजही संग्रह कायम ठेवला आहे. अण्णासाहेब लळींगकरांची बहीण कृष्णाबाई यांनी स्वरचित अहिराणी गीते गाऊन तर तालुक्यातील नरव्हाळचे दिवंगत रतन जाधव या शाहिराने आपल्या शाहिरीतून बाबासाहेबांचे मनोरंजन केले. १ ऑगस्ट रोजी बाबासाहेबांनी मुंबईला परत जाताना अण्णासाहेब लळींगकरांना धुळे जिल्ह्यातील तालुका असलेल्या नंदुरबार या आदिवासी मागास असलेल्या गावी जाऊन शैक्षणिक कार्य करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लळींगकर यांनी नंदुरबार शहरात जिल्ह्याचे तत्कालीन धुळे जिल्हाधिकारी कॅप्टन कुऱ्हे यांच्या हुकूमाने नंदुरबार येथे साक्री नाका परिसरात पाताळगंगा नदीकिनारी जागा मिळविली होती आणि त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी छात्रालयाची स्थापना केली होती.
पुरावे उपलब्ध आहेत : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता या दैनिकामध्ये बाबासाहेब धुळे येथे आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या डॉ. आंबेडकर लाइफ ॲण्ड मिशन या आत्मचरित्रामध्ये लेबर लीडर या प्रकरणात बाबासाहेबांच्या धुळे भेटीचा सर्व उतारा छापून आलेला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण खंड अठरा भाग दोनमध्ये त्यांचे धुळ्यातील भाषण छापले आहे. त्यात ट्रॅव्हलर्स बंगलोचा उल्लेख आढळला आहे. इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळ आणि हरिजन सेवक संघात बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील अभिप्राय उपलब्ध आहेत.
लळिंग वनक्षेत्राला बाबासाहेबांचे नाव : लळिंग कुरणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीवन असे नाव दिले आहे. शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांच्या काळात शासनाने हे नाव दिले. लांडोर बंगल्यावर भीमस्मृती मेळाव्यासाठी वनविभागासह पोलीस प्रशासनाने नियम आखून दिले आहेत. लळिंग कुरण हे राखीव वनक्षेत्र असल्याने आग पेटविणे, स्टॉल लावणे, वन्यप्राणी व वृक्षांना इजा पोहोचविणे, लाऊड स्पीकर लावणे आदी कृत्यास वन कायद्यानुसार सक्त मनाई करण्यात आली आहे. भीमस्मृती मेळाव्यावर वनविभाग आणि पोलिसांचे लक्ष असते. त्यामुळे भीम अनुयायांनी शांततेने अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, कचरा करु नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येते.
संदेश भूमीला स्मारकाचा दर्जा द्यावा : संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष आनंदा सैंदाणे यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी समाज प्रबोधनाचा संदेश दिलेल्या रेस्ट हाउसला पूर्वी ‘ट्रॅव्हलर्स बंगलो’ असे नाव होते. या वास्तूला आता आंबेडकरी अनुयायांनी ‘संदेश भूमी’ असे नाव दिले आहे. तसेच संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीची स्थापना केली आहे. या जागेला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, अशी त्यांची मागणी आहे.
फोटो गॅलरी
हेही वाचा