हजारो आदिवासींच्या मोर्चाने धुळे शहर दणाणले

Dhule News धुळे : मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या निषेधार्थ हजारो आदिवासी बांधवांनी गुरुवारी काढलेल्या भव्य जन आक्रोश मोर्चाने धुळे शहर दणाणले.
मणिपूर येथील आदिवासी महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी क्रांती सेनेसह समविचारी संघटनांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आदिवासी भिल्ल जनआक्रोश मोर्चा काढला. मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास रास्तारोको सारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.
निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर येथे गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अमानवीय अत्याचार सुरू असून, शासन या घटनांची दखल घेत नाही. यामुळे आता शासन बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच एरंडोल तालुक्यातील खडके बु. येथील आदिवासी विद्यार्थिनीवर लैंगिग अत्याचार करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, संबंधित वसतिगृह संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घालून शासकीय मान्यता रद्द करण्यात यावी, वसतिगृहात झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. मणिपूरमध्ये अत्याचार सुरू असतानाही शासन मात्र बघ्याची भुमिका घेत आहे. याबद्दल निवेदनातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. निवेदन दिल्यानंतर राजकुमार सोनवणे आणि लक्ष्मण पवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
निवेदनावर भरत जाधव, प्रदेशाध्यक्ष रंगनाथ ठाकरे, दौलत आहीरे, सचिव लक्ष्मण पवार, अनिल अहिरे, कार्याध्यक्ष महेंद्र माळी, भैय्या सोनवणे, सखुबाई भिल, विशाल मोरे, भारत देवरे, पंडित सोनवणे, प्रकाश सोनवणे, अनिल भिल, उमेश मोरे, व सुनिल ठाकरे यांच्या सह्या आहेत.













