राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘आयंबिल तप’चे आयोजन
Dhule News धुळे : जैन धर्मियांचे गुरु आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म. सा. यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आयंबिल तप होणार आहे.
‘आयंबिल तप’ या आचार्य आनंद ऋषी म. सा. यांच्या आवडत्या तपाने त्यांच्या १२३ व्या जन्मजयंति प्रित्यर्थ संपूर्ण देशात १७ ऑगस्ट रोजी त्यांना आदरांजली देण्याचा निश्चय ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कोन्फ्रेंसतर्फे करण्यात आला आहे. भारतभरातील सर्व स्थानिक श्रीसंघाच्या माध्यमातून तपस्यार्थीची व्यवस्था करण्यात येणार असून, धुळे येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे ही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यासाठीचे सहभागाचे कुपन्स जैन स्थानक ग. न. २, धुळे येथे उपलब्ध आहेत.
सदरील ‘आयंबिल तप’ अधिकाधिक संख्येने व्हावेत यासाठी श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कोन्फ्रेंसचे देशभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी अथक परिश्रम करत आहेत. सदरील तपाची विश्वविक्रमात नोंद व्हावी यासाठी राष्ट्रीय स्तरावर आवेदन देखील करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक बांधवांनी ‘आयंबिल तप’ च्या माध्यमातून आचार्य सम्राट प. पु. आनंदऋषीजी म. सा. यांना १२३ व्या जन्मजयंती प्रित्यर्थ आत्मकल्याणाच्या आणि विश्वशांतीच्या मार्गाने एक आगळीवेगळी भेंट देत, अधिकाधिक संख्यने सहभाग नोंदवावा, असे आवाहन ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कोन्फ्रेंस तसेच श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे करण्यात आले आहे.
जैन धर्मियांचे गुरु, करुणामूर्ती, राष्ट्रसंत, आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म. सा. यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कोन्फ्रेंस या स्थानकवासी जैन समाजाच्या शिखर संस्थेतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदमल छल्लाणी, निवर्तमान अध्यक्ष पारस मोदी व राष्ट्रीय संयोजक पिंटू कर्नावट यांनी विराट १,०८,००० आयंबिल तप महोत्सवाचे राष्ट्रव्यापी आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे आयंबिल तप?
सर्व धर्मीयांमध्ये उपवासाचे अनन्यसाधारण महत्व आहे. अहिंसक जैन धर्मीयांमध्ये तप हे आत्मशुद्धीचे महत्वाचे साधन मानण्यात आले आहे. जैन धर्मीयांमध्ये ‘तप’ करण्याला विशेष महत्व आहे. इंद्रियांवर संयम साध्य करणे म्हणजेच परमेश्वरत्व प्राप्त करणे ही धारणा बाळगणाऱ्या जैन धर्मीय बांधवांमध्ये ‘आयंबिल तप’ ची आपली वेगळी विशेषता आहे. निरंकट उपवासापेक्षा नीरस उपवास असल्याने हा उपवास करणे कठीण समजले जाते. उपवास, उनोदारी आणि रसपरित्याग अशा तिन्ही अर्थाने रसनेन्द्रीयावर संयम साधने ‘आयंबिल तप’ ने एकावेळी शक्य होते. यांत आंबट, गोड, तेल, तूप, मीठ, साखर व तत्सम रुची निर्माण करणाऱ्या नियमित वापराच्या वस्तू निषिध्द केल्या जातात. एकावेळी एकाच आसनात मर्यादित वेळेत हा उपवास सोडण्याचा नियम आहे.