अक्कलपाड्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
Dhule News धुळे : अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी धुळे शहरालगतच्या हरण्यामाळसह नकाणे तलावात आणण्यासाठी एक्सप्रेस आणि जम्बो असे दोन कॅनाॅल तयार केले आहेत. परंतु पाणीचोरी वाढल्याने काही गावांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरूवारी जोरदार निदर्शने केली.
अक्कलपाडा प्रकल्पातून कॅनाॅलद्वारे सोडलेले पाणी काही शेतकऱ्यांनी परस्पर वळविल्याची तक्रार धुळे पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली असून, सिंचन विभागाच्या भोंगळ कारभारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात जम्बो आणि एक्सप्रेस कॅनाॅलमधून पाणी सोडण्यात आले. परंतु लोहगड, लोणखेडी, चौगाव, कुसुंबा व नेर या भागातील शेतकऱ्यांनी जेसीबी, फावडी, टिकावच्या साहायाने छोट्या चाऱ्या करून पाणी वळवण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे तालुक्यात पाण्याची गंभीर परिस्थिती असून शेतकऱ्यांनी लाखो रुपयाच्या जमिनी हजारो रुपयांमध्ये दिलेल्या असताना व या मोबदल्यात शेतातून कॅनोल गेलेला असताना संबंधितांना पाणी मिळत नाही. यामुळे पाणी वितरणाच्या सुसूत्रतेसाठी सिंचन विभागास आदेश करावेत. हलगर्जीपणा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनावर सरदार हाके, अशोक मासुळे, धुडकू हालोर, जिभाऊ हालोर, संदीप हळगीर, रत्नाकर माणिक, पिजय शिंदे, देविदास शिंदे, धनराज हालोर, रमेश पदमर, भटु मासुळे, जगना हालोर, संतीलाल हालोर, कैलास मासुळे आदींची नावे आहेत.