बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांची शिवीगाळ
धुळे : शहरात घडलेल्या एका अपघाताची बातमी घेण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांनी शिवीगाळ केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी रात्री घडली.
शहरातील जेल रोडवर पोलिसांच्या वाहनाने एका चहाच्या टपरीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. पत्रकार आकाश सोनवणे या घटनेची बातमी घेण्यासाठी गेले. चित्रीकरण केले म्हणून पोलीस ठण्यात एका चौधरी नामक पोलीसाने त्यांना अर्वाच्च भाषा वापरत, अश्लील हातवारे करीत शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच चित्रीकरण करण्यास मज्जाव केला.
याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षकांना गुरुवारी सायंकाळी निवेदन देण्यात आले. तसेच पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण गाजत असताना आमदार पाटील समर्थकांनी महाजन यांना रस्ता अडवून बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ देखील वायरल होत आहे. सत्तेच्या या माजलेल्या प्रवृत्तीचाही पत्रकार संघाने निषेध केला.
या संदर्भात पत्रकारांशी चर्चा करताना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले की, एका वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात पोलिसांचे वाहन टपरीला धडकले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल. पत्रकार व पोलीस यांचे काम एकमेकांशी पूरक असले पाहिजे. या दृष्टीने पोलिसांना योग्य सूचना केल्या जातील.
निवेदनावर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, विद्यमान अध्यक्ष विशाल ठाकूर, उपाध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, कार्यकारणी सदस्य प्रकाश शिरसाठ, आकाश सोनवणे, सोपान देसले, जॉनी पवार, सिद्धार्थ मोरे, अभिजीत मोहिते, गोरख गर्दे, दीपक शिंदे, पप्पू अन्सारी, शेख अफरोज, भास्कर फुलपगारे, कार्तिक सोनवणे, रोशन खैरनार, देवेंद्र पाटील, उमाकांत कढरे, किशोर घुगे, सनी पवार यांच्या सह्या आहेत.