‘मेरी माटी, मेरा देश’अभियानातून शहिद वीरांना वंदन
धुळे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह जिल्हाभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाचा जिल्हास्तरीय सांगता समारंभ आज धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पांझरा नदीकिनारी, शासकीय ग्रंथालय जवळ, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका, धुळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता,जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर वैशाली वराडे, मनपा स्थायी समिती सभापती सौ. किरण कुऱ्हेवार, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अतिरिक्त उपायुक्त विजय सनेर, उपायुक्त संगिता नांदुरकर, श्रीमती. डहाळे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, यांच्यासह नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील स्वांतत्र्य वीराच्या कार्याची पुस्तिका तयार करावी
देशाच्या स्वांतत्र्य संग्रामात धुळे जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य वीर, शहीद जवानांचे कार्य उल्लेखनीय असे आहेत. आझादीच्या अमृतमहोत्सवाच्या ‘मेरी माटी, मेरा देश’ कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातील स्वांतत्र्यवीरांनी केलेल्या कार्यांची जनतेला तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी जिल्ह्यातील स्वांतत्र्य वीरांची एक पुस्तिका तयार करण्यासाठी जिल्हा परिषद, महापालिका व जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अशी पुस्तिका तयार झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी ठेवल्यास खऱ्या अर्थांने जिल्ह्यातील शहीद वीरांना मानवंदना देऊन या कार्यक्रमाची फलनिष्पती होईल असे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
देश स्वतंत्र होण्यासाठी खान्देशातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान महत्वाचे
देश स्वतंत्र होण्यासाठी खान्देशातील अनेक स्वातंत्र्यवीर, जवानांनी आपले बलीदान दिले असून जेव्हा देशासाठी आहुती व बलिदान देण्याची वेळ येते तेव्हा माझा खान्देश कुठेही मागे राहत नसल्याचे त्यांनी अनेक वेळा दाखवुन दिले असल्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. भामरे पुढे म्हणाले की, आझादी का अमृत महोत्सवानिमित्त देशातील तरुण, नागरिकांच्या मनात राष्ट्र भावना जागृत व्हावी, देशभरातील स्वांतत्र्य वीरांना कृतज्ञता व्यक्त करुन संपुर्ण देशात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी देशात अनेक कार्यक्रम घेण्यात येत आहे. देशाला 150 वर्षांच्या गुलामगिरीतुन मुक्त होण्यासाठी अनेक ज्ञात, अज्ञात स्वांतत्र्य सैनिकांनी बलिदान दिले असून ते कदापि विसरता येणार नाही. आजही जवळपास 15 लाख जवान भारत-पाक-चीन सीमेवर पहारा देत आहे. त्यामुळेच आपण सुखा समाधानाने जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले. 2047 पर्यंत देश विकसित व्हायचा असेल तर शासन, प्रशासनाबरोबर लोकांचे योगदान महत्वाचे आहे. देशाला विकसीत राष्ट्र करण्यासाठी दिवसातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास हा देश हितासाठी राहील यासाठी प्रत्येक नागरिकांनी शपथ घेतली तरच 2047 पर्यंत आपला देश विश्वगुरु आणि विकसित होईल असे त्यानी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम 9 ऑगस्टपासून राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील 558 ग्रामपंचायतस्तरावर, 4 नगरपालिका तसेच एक महानगरपालिका क्षेत्रात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी अंत्यत चांगले प्रकारे हा उपक्रम राबविण्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
महापौर प्रतिभाताई चौधरी, आयुक्त देविदास टेकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक व वीरजवानांचे शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच वसुंधरा वंदन, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन करून, पंचप्रण अर्थात शपथ घेण्यात आली. त्यासोबतच ध्वजारोहण उपक्रम राबविण्यात आला. तसेच पांझरा नदी किनारी 75 अमृत रोपवाटिकेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक व वीरजवानांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी शहीद अब्दुल हमीद स्मारक, संतोषी माता चौक येथून कलश यात्रा व वृक्ष दिंडी आयोजित करण्यात आली. वृक्षदिंडी शिवतीर्थ नूतन महानगरपालिका, झाशी राणी पुतळा, राणाप्रताप चौक, वीर सावरकर पुतळा मार्गे निघाली. यात लेझीम पथक, अग्निशमन पथक, पथनाट्य, देशभक्तीपर गीते व भारत मातेची शोभायात्रा असे विविध पथकांसह कलश यात्रा कार्यक्रमास्थळी दाखल झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सनेर यांनी सुत्रसंचलन जगदीश देवपूरकर, वाहीद अली यांनी तर आभार प्रदर्शन अनिल साळुंखे यांनी मानले.