नवीन अंगणवाड्यांना मंजूरी द्या!
Mumbai मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात अंगणवाड्यांची संख्या मर्यादित असल्याने लहान बालकांना आनंददायी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन शहरात नवीन अंगणवाड्या मंजूर करण्याची मागणी केली.
धुळे शहरासाठी सुमारे वीस वर्षांपूर्वीची लोकसंख्या गृहीत धरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील बालके आणि झोपडपट्टीवासीयांच्या बालकांना आनंददायी शिक्षण हसत खेळत शिक्षण व अक्षर ओळख निर्माण व्हावी या हेतूने तत्कालीन लोकसंख्या गृहीत धरून अंगणवाडी मंजूर केल्या होत्या. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे धुळे शहरातील एकूण घोषित आणि अघोषित झोपडपट्ट्यांची संख्या सुमारे सुमारे 70 पेक्षा जास्त झालेली आहे. त्याचबरोबर शहराच्या एकूण लोकसंख्येच्या 35 ते 40 टक्के लोक हे अशा झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. गरीबीमुळे जगण्याची ओढाताण झाल्यामुळे मुलांना शिक्षण कसे देणार अशी विवंचना असल्याने त्याचा सरळ सरळ परिणाम लहान बालकांच्या बौद्धिक क्षमतेवर झालेला दिसून येतो. त्यासाठी अंगणवाड्यांच्या माध्यमातून लहान बालकांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी नवीन अंगणवाड्या होणे अत्यंत आवश्यक आहे. शहरातील ही गहण समस्या आ. फारुख शाह यांनी मंत्री आदिती तटकरे यांना लक्षात आणून दिली. आमदार फारुख शाह यांच्या नवीन अंगणवाड्यांच्या मंजुरी बाबतच्या मागणीचा मंत्री अदिती तटकरे यांनी सकारात्मक विचार करून लवकरात लवकर केंद्र शासनाकडून वाढीव अंगणवाड्यांची मंजुरी मिळवून धुळे शहराचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.