शाळकरी मुला-मुलींनी काढली बालमजुरीविरोधी रॅली
धुळे : तालुक्यातील विश्वनाथ येथे जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय आणि लुपिन ह्यूमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालमजुरी प्रतिबंधक जनजागृती रॅली काढण्यात आली.
विद्यालयाचे उपशिक्षक विजय पाटील यांनी ‘बालमजुरी एक शाप’ या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. बालमजुरीची कारणे व परिणाम याच्यावर सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर, व्यक्तिमत्त्वावर व शैक्षणिक विकासावर कशा प्रकारे दुष्परिणाम होतात याविषयी सविस्तर माहिती दिली. फाउंडेशनचे विजय रोकडे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून फाउंडेशनतर्फे शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे ग्रामीण कृषी मित्र विजय रोकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका महानंदा विजय पाटील, उपशिक्षक के. जे. सूर्यवंशी, आर. एम. पाटील, पी. बी. पाटील, चेतना पाटील, संजीवनी पाटील, भरत पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.