आगामी निवडणुकांमध्ये भाजपसमोर इंडिया आघाडीचे आव्हान
धुळे : इंडिया आघाडीच्या नावाने गुरुवारी देशभरातील भाजप विरोधी पक्ष संघटनांची बैठक झाली. काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना दिलेल्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातही काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय इंडिया मीट बैठकीला चांगला प्रतिसाद लाभला.
शहरातील काँग्रेस भवनामध्ये गुरुवारी पार पडलेल्या या बैठकीला भाजपविरोधी पक्ष-संघटनांचे सुमारे २०० प्रतिनिधींची उपस्थिती लाभल्याने इंडिया आघाडीचे प्रतिबिंब पाहावयास मिळाले. या बैठकीला उपस्थित प्रतिनिधींनी भाजपच्या ध्येयधोरणावर कडाडून टीका केली.
इंडिया आघाडीचे पाच ठराव : यावेळी पाच ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. त्यात धुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, धुळे महानगरपालिकेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करा, धुळे जिल्ह्यात अवैध धंदे पूर्णपणे बंद करून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करा, केंद्रीय तपास यंत्रणाचा धाक दाखवून राजकीय मंडळींचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचा निषेध, इंडिया आघाडी ठरवेल त्या उमेदवारांचा सर्वांनी एक दिलाने प्रचार करून निवडणुका जिंकणे या विषयांचे ठराव संमत झाले.
बैठकीला यांची उपस्थिती : या बैठकीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी आमदार वसंतराव सूर्यवंशी, अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, शिवसेना उबाठाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे, महेश मिस्त्री, डॉ. सुशील महाजन, किरण जोंधळे, शुभांगी पाटील, कैलास पाटील, पंकज गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत राजे भोसले, जितेंद्र मराठे, दीपक देवरे, विमल बेडसे, काँग्रेसचे डॉ. अनिल भामरे, डॉ. दरबारसिंग गिरासे, गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, प्रमोद सिसोदे, बापू खैरनार, गायत्री जयस्वाल, बानुबाई शिरसाट, रिपाई गवई गटाचे प्रा. बाबा हातेकर, सपाचे अमीन पटेल, बसपाचे अनिल दामोदर, वंचितचे राज चव्हाण, कॉ. एल. आर. राव, आपचे जितेंद्र पवार, शकील अहमद, डॉ. एस. टी. पाटील, सुरेश बैसाणे यांच्यासह भाजपविरोधी पक्षसंघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फटाक्यांची आतिषबाजी : राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला. शेवटी काँग्रेस भवनासमोर रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करीत भाजपविरोधी एकजुटीचा जल्लोष करण्यात आला.