मराठा आरक्षण प्रकरण : सोशल मीडिया अकाउंट्सवर सायबर सेलची करडी नजर
धुळे : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली किंवा शेअर केली तर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिला आहे. सोशल मीडिया अकाउंट्सवर सायबर सेलची करडी नजर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धुळे जिल्हा पोलीस दलाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जालना येथे 31 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने अफवा पसरविण्यात येत आहेत. सदर प्रकरणातील संबंधित दोषींवर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. कोणीही कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर चुकीचे संदेश, अफवा, व्हिडिओ, पोस्ट, छायाचित्रे प्रसारित करू नये किंवा स्टेटस ठेवू नये, असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर तसेच धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलमार्फत अशा प्रकारच्या सोशल मीडिया अकाउंट ग्रुपवर सतत निगराणी ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारे आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ, पोस्ट, छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिला आहे.