शरद पवारांवरील आरोपांबद्दल काय म्हणाले रोहित पवार?
धुळे : राज्यात अनेक वर्षे मुख्यमंत्री, केंद्रातही मोठे मंत्री असणाऱ्या शरद पवारांनी (sharad pawar) मराठा समाजाला न्याय का दिला नाही, असा प्रश्न माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे (subhash bhamare) यांनी केला होता. राज्यातही तसे आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर होत असलेल्या या आरोपांबद्दल प्रश्न विचारला असता, आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी या प्रश्नाला बगल देत बोलणे टाळले. या आरोपांना पवार साहेबच उत्तर देतील, असे ते म्हणाले. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.
राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करीत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
महागाईसह विविध कारणांमुळे जनमत भाजपच्या विरोधात असल्याने निवडणुकीत हार पत्करावी लागेल या भितीपोटी ओबीसी आरक्षणाचा घोळ घातला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला.
धुळ्यात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जालना येथील घटनेवरून चांगला निशाणा साधला. जालना लाठीचार्ज प्रकरणात राज्य सरकारने माफी मागावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी धुळ्यात पत्रकारांशी बोलताना केली. त्याचबरोबर आधी लाठीचार्ज झाला मगच दगडफेक झाली असल्याचे देखील स्पष्ट करीत आमदार रोहित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणाचातरी फोन आल्यानंतर आंदोलनकर्त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप देखील राज्य सरकारवर केला. राज्यामध्ये जेव्हा जेव्हा अनुचित घटना घडल्या, तेव्हा तेव्हा त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. जालना येथील घटनेस गृह विभाग जबाबदार असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
इलेक्शन कमिशन ही भाजप सत्ताधाऱ्यांच्या हाताची बाहुली झालं असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या अहंकाराची लागण आमच्यातून गेलेल्या काहींनाही झाली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याकडेच राहील, अशी भाषा त्यांच्याकडून केली जात असल्याचा टोला त्यांनी अजित पवार गटाला लगावला.
राज्यात 21 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची टक्केवारी कमी आहे. दुबार पेरणीचा प्रश्न खूप मोठा आहे. आज दुबार पेरणी होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाणार आहे. आता कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. शेतामध्ये पिकांची वाढ समाधानकारक नाही. त्यामुळे उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. या दोन्ही गोष्टींचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. त्यासाठी सर्वे केला पाहिजे. कोणाचे किती नुकसान झाले याचा अहवाल सरकारने तयार करावा. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सुद्धा फार वाईट आहे. अनेक ठिकाणी टँकरची मागणी असताना सरकारकडून अजून टँकर दिले गेले नाहीत. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच दुष्काळात शैक्षणिक फीचा प्रश्न समोर येत असतो. मुला-मुलींना शाळेची, कॉलेजची फी देता येत नाही. कारण बहुतांश कष्टकऱ्यांची मुलं आहेत. ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे दुष्काळ जाहीर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. पण हे सरकार त्या बाबतीत कुठेही चर्चा करताना दिसत नाही. एक मंत्री भारताच्या बाहेर जात असतात तर दुसरे मंत्री काय बोलतात त्यांनाच कळत नाही. जाहिरातीमध्ये सगळे गुंतलेले आहेत.
शासन आपल्या दारीमध्ये खरंतर सर्व योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे एका कार्यक्रमाला येतात म्हणून तीन-तीन महिने योजना सुद्धा दिल्या जात नाहीत. या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. पैशाचा उन्माद थांबला पाहिजे आणि येत्या काळामध्ये शासनाला लोकांच्या दारी घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजे.
वन नेशन वन इलेक्शनला विरोध केला पाहिजे, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला हुकुमशाही आणायची आहे. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना राबविण्याचा अट्टाहास भाजपतर्फे करण्यात येत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी सोमवारी धुळ्यात केला.
विद्या चव्हाण यांची घणाघाती टिका
आज मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. (maratha reservation) आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठी हल्ला केला. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांचा राजीनामा मराठा समाज मागतो आहे. पण ते या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला तयार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मराठा समाजाला आरक्षण नाकारायचं. मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यावर या निर्णयाला विरोध करणारा पक्ष देखील भाजपच होता. आरक्षणाला विरोध करण्यामागचं कारण म्हणजे भाजपला केवळ ब्राह्मण्यवाद हवा आहे, अशी घनाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी धुळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात केली.
हेही वाचा