मराठा मोर्चा कार्यकर्त्यांवरील लाठीचार्जचा एमआयएम पक्षातर्फे निषेध
धुळे : जालना (jalana) जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा एम आय एम पक्षाने जाहिर निषेध केला. याबाबत धुळे येथे सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले होते. आंदोलन सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknatha shinde cm) यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी संपर्क करून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. शुक्रवारी प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे यांना उपचारासाठी घेवून जात असतांना आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा देखील उपयोग केला. या अमानुष लाठीचार्जचा जाहीर निषेध धुळे जिल्हा एमआयएमच्या (MIM) वतीने करण्यात येत आहे.
घटनाक्रम लक्षात घेता सकृतदर्शनी पोलीस प्रशासनाने गंभीर चुक केल्याचे दिसून येते. मराठा मोर्चाचे कार्यकर्ते २९ ऑगस्टपासून शांततेने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असताना पोलीस प्रशासनाने त्याच दिवशी मोठा फौजफाटा गोळा करून ठेवला आणि अंतरवाली सराटीचा इतर गावांशी संपर्क तोडण्यात आला. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता मुख्यमंत्री येणार आहेत, अशी खोटी थाप मारण्यात आली. म्हणजे आंदोलन चिरडण्याची पोलिसांची पुर्वनियोजित योजना होती. याचा सरळ सरळ अर्थ होतो कि जनतेने त्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करू नये. महाविकास आघाडीचे सरकार असताना ”आमचे सरकार येवू द्या, फक्त दोन महिन्यात मराठा आरक्षण देतो”, असे म्हणणारे भाजपाचे नेते सत्ता हातात येवून सव्वा वर्ष झाले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही. हे अपयश झाकण्यासाठी तर आंदोलन चिरडण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न करीत नाही ना ? असा सवाल या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत.
जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावात होणा-या आंदोलनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची गरजच काय? भाजपाचे सत्ताधारी कायमच मराठा आरक्षणाबद्द्ल मराठा समाजाला गाजर दाखवत आलेले आहेत आणि याचा जाब विचारल्यावर लाठीचार्ज आणि आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातात. यापूर्वी सुमारे पाच वर्षांपुर्वी नवी मुंबईतील कामोठे येथे मराठा मोर्चा आंदोलकांवर कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि आता देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. यानिमित्ताने आंदोलक मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना जीवनातून उठवायचे ही संघ-भाजपाची कुटील नीती समोर आलेली आहे.
मागण्या अशा : १) मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे. (maratha reservation) २) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज मधील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे. ३) लाठीचार्ज करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. ४) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
निवेदन देताना नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक युसुफ मुल्ला, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक सईद बेग मिर्झा नगरसेवक मुकतार अन्सारी, नगरसेवक आमिर पठाण, नासिर पठाण, मुक्तार अन्सारी, डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, रफिक शाह, आमीर पठाण, अकिब अली, हमिद अन्सारी, हालीम शमसुद्दिन, माजिद पठाण, निजाम सैय्यद, जिद्या पहिलवान, सउद सरदार, माजी नगरसेवक साजिद साई, सलीम शाह, सलमान खान, शोएब मुल्ला, नजर खान, हलीम शमसुद्दिन, सायेदा अंसारी, अकिला शेख, महेमुना अंसारी, सलीम शाह, इब्राहिम पठाण, इकबाल शाह आदी उपस्थित होते.
हेही वाचा