राज्यातील या शिक्षकांवर शिक्षक दिनीच आमरण उपोषण करण्याची वेळ का आली?
अहमदनगर (Ahmadnagar) : राज्यातील ३७ एकलव्य निवासी शाळेतील शिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी या शाळांमधील सर्व शिक्षकांनी शिक्षक दिनीच म्हणजे ५ सप्टेंबरपासून आपापल्या शाळेत आमरण उपोषण सुरू केले आहे. या शिक्षकांनी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्यासह आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि प्रकल्पाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. Eklavya Recidencial Model School
काय आहे नेमके प्रकरण? : निवेदनानुसार, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक (Maharashtra Tribal Public School Socity Nashik) या संस्थेमार्फत आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये राज्यात ३७ एकलव्य निवासी शाळा सुरु आहेत. या ३७ शाळांमध्ये एकूण ४०६१ मुले तर ४०९० मुली असे एकूण ८१५१ आदिवासी विद्यार्थी सीबीएससीचे शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये सरळ सेवा भरतीद्वारे २०१८ व २०१९ च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र सन २०२१ व २०२२ मधील नियुक्ती आदेशात परीविक्षा कालावधी विलोपित होणे अपेक्षित होते. परंतु कामाचे मुल्यांकन अहवाल जाऊनही तो पूर्ण केला गेला नाही. परिविक्षा कालावधी विलोपित करून नियमित वेतनश्रेणी अद्यापपर्यंत लागू करण्यात आली नाही.
आश्वासन देऊनही निराशाच : दिल्ली येथील केंद्रीय जनजाती आदिवासी आयुक्त आणि नेस्ट यांनीही चर्चेअंती आश्वासन देऊनही प्रश्न प्रलंबितच ठेवला आहे. त्यामुळे सन २०१८ व २०१९ चे सर्व कर्मचारी ५ सप्टेंबरपासून आपापल्या शाळेत कर्तव्यावर हजर राहून जोपर्यंत परिविक्षाधीन कालावधी विलोपित होऊन नियमित वेतन श्रेणी लागू होत नाही तोवर आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषण काळातही शिकविणार : उपोषण काळात देखील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडणार नाही. शाळेत नियमित शिकवून उपोषण करणार आहेत. आंदोलनातही विद्यार्थी हिताची काळजी घेणाऱ्या या शिक्षकांसंदर्भात शासनाने ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
या शिक्षकांचा उपोषणात सहभाग : अहमदनगर जिल्ह्यातील एकलव्य निवासी शाळेतील महेश तात्याबा सहाने, अविनाश बबनराव पवार, रवींद्र बबनराव काकडे, लक्ष्मण भगवान उदमले, नवनाथ देवराव इंगळे, बुद्धभूषण गौतम भामरे या शिक्षकांनी कर्तव्यावर हजर राहून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा