शिक्षक दिनी शिक्षकांचा गौरव
धुळे : आईवडीलांबरोबरच प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे मोठे महत्व असते. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतो. एक आदर्श नागरिक घडविण्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे शिक्षक हा एकंदरीतच समाजव्यवस्थेला दिशा देणारा मार्गदर्शक गुरु असतो असे प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी केले.
जि.प.च्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्याप्रसंगी गुप्ता बोलत होते. कार्यक्रमात आदर्श शिक्षकांचा शाल, बुके, सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सपत्नीक ओटी, बुके देऊन सत्कार करण्यात आला.
आदर्श शिक्षकांची नावे : जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार स्मिता शिवाजी पाटील (जि. प. शाळा. मुकटी ता.धुळे), भारती दामोदर देसले (जि. प. शाळा राजबाई शेवाळी ता. साक्री), उमाकांत हिरालाल गुरव (जि. प. शाळा मोहिदा ता. शिरपूर) , संगीता भास्कर मराठे (जि. प. शाळा वारगांव ता. शिंदखेडा) यांना प्रदान करण्यात आला. प्रतिभावंत शिक्षक पुरस्कार प्रतिभा शांताराम साळुंखे (जि. प. शाळा शेवाळी (दा) ता. साक्री) यांना देण्यात आला. जिल्हा आदर्श शिक्षक (उत्तेजनार्थ) पुरस्काराने रुखमा महारू पाटील (जि. प. शाळा गोताणे ता. धुळे), वैशाली प्रभाकर सोनवणे (जि. प. शाळा धोंगडे विगर ता. साक्री), दीपक विनायक पाटील (जि. प. शाळा मांजरोद ता. शिरपूर), कुसुम ओंकार चौधरी (जि.प. शाळा विखरण देवाचे ता. शिरपूर) या शिक्षक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मंगळवारी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा अश्विनी पवार होत्या. याप्रसंगी शिक्षण समिती सभापती महावीर सिंह रावल, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे आदी मान्यवरांसह शिक्षक शिक्षक उपस्थित होते.