धुळे जिल्ह्यात राजकीय वादातून उपसरपंचावर प्राणघातक हल्ला
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील जोगशेलू गावात राजकीय वादातून विरोधी गटाच्या एका जमावाने उपसरपंचांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना पाच सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमाराला घडली.
या हल्ल्यात उपसरपंच किरण आनंदराव देसले (वय 48) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत किरण देसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील सुरेश साहेबराव पाटील, रवींद्र साहेबराव पाटील, सागर रवींद्र पाटील, कल्पेश सुरेश पाटील, समाधान सुरेश पाटील, दीपक अशोक पाटील, बालाजी अशोक पाटील यांनी राजकीय वादातून हातात लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला. किरण देसले यांना मारहाण करण्यात आली. तसेच सागर रवींद्र पाटील याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या पुतणीच्या अंगावरील कपडे फाडून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच वहिनीला अश्लील शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी किरण देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस ठाण्यात भादंवी कलम 307, 143, 147, 148, 149, 354, 294, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार करीत आहेत.